H1N1 influenza a cases in india  Pudhari
राष्ट्रीय

H1N1 Influenza Cases : सावधान! इन्फ्लुएन्झा अ च्या तब्बल ९८% रुग्णांना H1N1 ची लागण; ICMR महासंचालक

'रिअल-टाइम' निरीक्षण यंत्रणा अधिक मजबूत

पुढारी वृत्तसेवा

H1N1 influenza a cases in india : देशात श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांमध्ये 'इन्फ्लुएन्झा अ'च्या 'H1N1' स्ट्रेनचा प्रादुर्भाव सर्वाधिक वाढला असून, एकूण तपासणी केलेल्या 'इन्फ्लुएन्झा अ' बाधितांपैकी तब्बल ९८ टक्के रुग्णांमध्ये H1N1 चा संसर्ग आढळून आला आहे, अशी माहिती 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'चे (ICMR) महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी आज (दि. २४) पत्रकार परिषदेत दिली.

'रिअल-टाइम' निरीक्षण यंत्रणा अधिक मजबूत

कोरोना महामारीनंतर भारतात विषाणूजन्य संसर्गाचा मागोवा घेण्यासाठी 'रिअल-टाइम' निरीक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 'इंटीग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म' (IHIP) आणि 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' (NCDC) द्वारे मिळणाऱ्या राज्यस्तरीय आकडेवारीसोबतच, आयसीएमआरने देशभरातील ७३ प्रमुख प्रयोगशाळा आणि रुग्णालयांच्या माध्यमातून थेट 'सेंटिनेल सर्व्हेलन्स' नेटवर्क तयार केले आहे. या बहुस्तरीय यंत्रणेमुळे कोणत्याही संसर्गाचा तातडीने शोध घेऊन उपाययोजना करणे शक्य होत आहे.

H3N2 आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट

विषाणूंबाबत अधिक माहिती देताना डॉ. बहल म्हणाले, "सध्या मानवामध्ये 'इन्फ्लुएन्झा अ' आणि 'इन्फ्लुएन्झा ब' हे दोन्ही विषाणू आढळतात. मात्र, 'इन्फ्लुएन्झा अ' प्रकारात H1N1 चे प्रमाण ९७ ते ९८ टक्क्यांपर्यंत आहे, तर 'H3N2' चे प्रमाण केवळ २ ते ३ टक्केच आहे. याशिवाय 'इन्फ्लुएन्झा ब' च्या 'व्हिक्टोरिया लिनिएज'चा संसर्गही काही प्रमाणात दिसून येत असला तरी H1N1 चाच भरणा सर्वाधिक आहे. दुसरीकडे, 'कोरोना' (SARS-CoV-2) बाधितांची संख्या आधीच्या तुलनेत आता सातत्याने कमी होत आहे."

आजार आणि लक्षणे

H1N1 सह ऋतूमानानुसार होणारा हा इन्फ्लुएन्झा बहुतांश रुग्णांमध्ये आपोआप नियंत्रित होणारा (self-limiting) आजार आहे. ताप, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी ही याची सामान्य लक्षणे असून, योग्य काळजी आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास रुग्ण यातून पूर्णपणे बरे होतात, असे स्पष्टीकरणही आयसीएमआरतर्फे देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT