Kawad Yatra 2025
ग्वाल्हेर–आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारा अपघात झाला. शीतला माता मंदिराजवळील गेटजवळ एका भरधाव आणि अनियंत्रित कारने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या कावड यात्रेकरूंना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ४ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर तर अनेकजण जखमी आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील चार पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास कावडयांचा जत्था शीतला माता मंदिराजवळील महामार्गाच्या कडेने जात होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने कावडयांना उडवत महामार्गाखालील झाडाझुडपात जाऊन ती उलटली. अपघातावेळी कारचा वेग इतका प्रचंड होता की, धडकेने अनेक कावडीये दूरवर फेकले गेले होते.
या अपघातात मृत्यू झालेले सर्व कावड यात्रेकरू ग्वाल्हेरच्या घाटीगाव परिसरातील सिमरिया गावचे रहिवासी होते. मृतांची ओळख पटली असून पूरन बंजारा, रमेश बंजारा, दिनेश बंजारा आणि धर्मेंद्र उर्फ छोटू, अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात इतरही अनेक कावडीये जखमी झाले असून, त्यांना तातडीने ग्वाल्हेरच्या जेएएच ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घाटीगावच्या सिमरिया पंचायतीमधील लोक दोन दिवसांपूर्वी कावड यात्रेसाठी निघाले होते. हे सर्वजण भदावना येथून गंगाजल घेऊन घाटीगावला परतत होते. बुधवारी या गंगाजलाने महादेवाचा अभिषेक केला जाणार होता, पण त्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेली कार कावडयांना चिरडत जाऊन उलटली. मात्र, कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचले. ते जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.