

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गलवान खोर्यातील संघर्षानंतर चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवत भारताने सीमेवर पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा वेग प्रचंड वाढवला आहे. याचाच एक भाग म्हणून, चिनी सैन्याच्या टेहळणीपासून पूर्णपणे सुरक्षित असलेला, लडाखमधील दौलत बेग ओल्डी (डीबीओ) या सामरिकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राला जोडणारा पर्यायी मार्ग पुढील वर्षी वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. या नव्या रस्त्यामुळे भारतीय लष्कराला सैन्य आणि रसद पुरवठा अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करता येणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेला दारबुक-श्योक-डीबीओ मार्ग चीनच्या थेट नजरेत येतो, ज्यामुळे लष्करी हालचाली गोपनीय ठेवण्यात अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी सीमा रस्ते संघटना 130 किलोमीटर लांबीचा ससोमा-सासेर ला-सासेर ब्रांगसा-गपशन-डीबीओ हा नवा मार्ग वेगाने पूर्ण करत आहे. या मार्गामुळे लेह ते डीबीओ हे अंतर तब्बल 79 किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाला लागणारा दोन दिवसांचा वेळ अवघ्या 11-12 तासांवर येईल.
हा नवा मार्ग केवळ वेळेची बचत करणार नाही, तर चिनी सैन्याच्या नजरेआड राहून भारतीय लष्कराला कोणत्याही परिस्थितीत सैन्य आणि शस्त्रसामग्री सीमेवर पोहोचवण्यास मदत करेल. दौलत बेग ओल्डी येथे 16,614 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच हवाई पट्टी आहे. काराकोरम पास आणि वादग्रस्त देपसांग खोर्याजवळ असल्यामुळे या भागाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षण सूत्रांनुसार, सीमावर्ती रस्ते संस्थेने या मार्गावरील 9 पुलांची क्षमता 40 टनांवरून 70 टनांपर्यंत वाढवली आहे, जेणेकरून बोफोर्स तोफा आणि इतर अवजड लष्करी वाहने सहजतेने ने-आण करता येतील.
दोन मार्ग, मोठा फरक!
जुना मार्ग : चीनच्या थेट नजरेखाली, लष्करी हालचालींसाठी असुरक्षित.
नवा मार्ग : पूर्णपणे सुरक्षित, वेगवान आणि चिनी टेहळणीपासून मुक्त.
वेळेत प्रचंड बचत : प्रवासाचा वेळ 2 दिवसांवरून थेट 11-12 तासांवर येणार.
संपूर्ण सुरक्षा : चिनी सैन्याच्या नजरेआड सैन्य आणि रसद पुरवठा करणे शक्य, ज्यामुळे गोपनीयता टिकून राहील.
कमी : लेह ते ऊइज हे अंतर तब्बल 79 कि.मी.ने कमी होणार.
अवजड वाहतूक शक्य : मार्गावरील पुलांची क्षमता 70 टनांपर्यंत वाढवली, त्यामुळे रणगाडे आणि बोफोर्स तोफा सहज नेता येतील.
येथे जगातील सर्वात उंच (16,614 फूट) हवाई पट्टी आहे.
काराकोरम पास आणि देपसांग सारख्या संवेदनशील भागाजवळ असल्यामुळे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण.
कठीण हवामान : 17,000 फुटांपेक्षा जास्त उंची, प्रचंड बर्फवृष्टी आणि ऑक्सिजनची कमतरता.
बीआरओचा उपाय : कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी विशेष ‘ऑक्सिजन कॅफे’ची निर्मिती.
बारमाही कनेक्टिव्हिटी : भविष्यात सासेर ला येथे 8 किमी लांबीच्या बोगद्याचे नियोजन, ज्यामुळे हा मार्ग वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहील.
निर्माता : सीमा रस्ते संघटना - राष्ट्राच्या सेवेत सदैव तत्पर!