IVF twins DNA test file photo
राष्ट्रीय

IVF द्वारे नऊ महिने पोटात वाढवून जुळ्या मुलींना जन्म दिला; पण DNA कोणाशीच जुळेना, नेमकी कुठे झाली चूक?

आयव्हीएफ उपचाराद्वारे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर एका दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे.

मोहन कारंडे

IVF twins DNA test

गुरुग्राम: आयव्हीएफ उपचाराद्वारे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर एका दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. नवजात मुलींमध्ये स्वतःचे कोणतेही साम्य दिसत नसल्याने केलेल्या DNA चाचणीत त्या मुली जैविकदृष्ट्या आपल्याच नसल्याचे समोर आले. या प्रकरणात नेमकी चूक कुठे झाली आणि आपली खरी मुले कुठे आहेत, याचा शोध घेण्यासाठी हे दाम्पत्य गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहे.

राहुल राठोड आणि त्यांच्या पत्नी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक अनुभव सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एका नामांकित IVF रुग्णालयात उपचार सुरू केले. वीर्य नमुने आणि स्त्रीबीज तसेच भ्रूण विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. १४ मार्च रोजी महिलेच्या गर्भाशयात भ्रूण प्रत्यारोपित करण्यात आले आणि यावर्षी जानेवारीमध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.

मात्र, जन्मानंतर काही दिवसांतच दाम्पत्याच्या मनात शंका निर्माण झाली. जुळ्या मुलींमधील एका मुलीचे चेहरेपट्टी आणि शारीरिक वैशिष्ट्ये त्यांच्याशी अजिबात जुळत नव्हती. विशेषतः त्या मुलीत ईशान्य भारतातील लोकांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये दिसत होती. त्यामुळे दाम्पत्याने DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांना धक्का बसला. अहवालानुसार, दोन्ही मुलींचा या दाम्पत्याशी जैविक संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. प्रकरण गंभीर वळणावर गेल्यानंतर राहुल यांनी विविध प्रशासकीय यंत्रणांकडे धाव घेतली. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "पहिले तीन महिने पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नाही. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ३१ मार्च रोजी एफआयआर नोंदवण्यात आला," असे राहुल यांनी सांगितले.

एफआयआर नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तपासावर स्थगिती आल्याने चौकशीची प्रक्रिया अडकली. दरम्यान, ५ जून रोजी न्यायालयाने महत्त्वाचा आदेश देत IVF केंद्रातील भ्रूण नोंदवहीसह सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. मात्र, अद्याप ही कागदपत्रे जप्त करण्यात आलेली नाहीत. राहुल यांनी सांगितले की, त्यांचा कोणत्याही रुग्णालयावर थेट आरोप करण्याचा हेतू नाही. "आम्हाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की आमची खरी मुले कुठे आहेत," अशी भावनिक विनंती त्यांनी केली.

या संपूर्ण घटनेचा सर्वाधिक मानसिक आणि शारीरिक त्रास महिलेने सहन केला आहे. तिने सांगितले की, ही तिची तिसरी सिझेरियन शस्त्रक्रिया होती. प्रसूतीनंतर काही दिवसांतच तिला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि तासन्तास बसवून ठेवण्यात आले. मात्र, तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सततच्या मानसिक तणावामुळे काही काळ स्मरणशक्तीवरही परिणाम झाल्याचे तिने सांगितले. अनेक महिने गेल्यानंतरही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे दाम्पत्य अजूनही अनिश्चिततेच्या छायेत जगत आहे.

डोळ्यांत अश्रू आणत त्या महिलेने प्रशासनाला भावनिक साद घातली. "आमच्या मुलांचा काय दोष आहे? मी गर्भधारणा केली, मी बाळांना जन्म दिला, पण माझी खरी मुले कुठे आहेत? या चुकीला जबाबदार कोण?" असा प्रश्न तिने उपस्थित केला. हात जोडून प्रशासनाकडे विनंती करत तिने आपल्या मुलांचा शोध लावण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT