IT couple death File Photo
राष्ट्रीय

IT couple death: पत्नीच्या कपड्यांवर ‘आय लव्ह यू’ अन् बाजूला चिठ्ठी...; आयटी दांपत्याच्या मृत्यूपूर्वी नक्की काय घडलं?

“आम्ही हे जग सोडून जातोय...” असा ई-मेल कंपनीला पाठवून एका तरुण आयटी अभियंत्याने आपल्या पत्नीसह आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

IT couple death

गुरुग्राम: “आम्ही हे जग सोडून जातोय...” असा ई-मेल कंपनीला पाठवून एका तरुण आयटी अभियंत्याने आपल्या पत्नीसह आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये उघडकीस आली आहे. गुरुवारी एम३एम मरिना सोसायटीतील फ्लॅटमध्ये तरूणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच्या पत्नीचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेपूर्वी त्याने पत्नीच्या कपड्यांवर ‘आय लव्ह यू’ असे लिहिले होते, तर फ्लॅटमध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे.

ई-मेलमुळे घटना उघडकीस

मोहम्मद अस्लम (वय ३०) आणि फरहाना (वय २८) असे या दांपत्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास अस्लमने आपल्या कंपनीला एक ई-मेल पाठवला, ज्यामध्ये त्याने “आम्ही जग सोडत आहोत” असे लिहून घर मालकाचा आणि पालकांचा फोन नंबर दिला होता. ई-मेल पाहताच कंपनीच्या सहकाऱ्यांनी तातडीने घरमालकाशी संपर्क साधला. घरमालकाने फ्लॅटवर जाऊन पाहिले असता दार आतून बंद नव्हते. आत अस्लम गळफास घेतलेल्या आणि फरहानाच्या मानेवर जखमेच्या खुणा असलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

पत्नीची हत्या करून आत्महत्या?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. फरहानाच्या कपड्यांवरही 'आय लव्ह यू' असे लिहिलेले आढळले. पोलीस आता या संदेशांची आणि अपार्टमेंटमधून जप्त केलेल्या इतर वस्तूंची तपासणी करत आहेत, जेणेकरून या जोडप्याच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधता येईल.

प्राथमिक अंदाजानुसार, अस्लमने आधी फरहानाचा गळा आवळून किंवा शस्त्राने हत्या केली असावी आणि नंतर स्वतः गळफास लावून जीवन संपवले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनाक्रम आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२०२३ मध्ये लग्न

हे जोडपे सुमारे तीन महिन्यांपूर्वीच बेंगळूरहून गुडगावला राहायला आले होते. कोझिकोडचा रहिवासी असलेला अस्लम, इंडोनेशियास्थित एका आयटी कंपनीत काम करत होता. तर फरहाना, बेंगळूरमधील एका आयटी कंपनीसाठी 'वर्क फ्रॉम होम' करत होती. त्यांचे २०२३ मध्ये लग्न झाले होते. गुडगावला येण्यापूर्वी सुमारे दोन वर्षे बेंगळूरमध्ये राहायला होते. अस्लमने २०१८ मध्ये एनआयटी कालिकत येथून इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली होती आणि २०२० मध्ये आयआयएम इंदूरमधून एमबीए केले होते. फरहानाने केरळमधील कुट्टीपुरम येथील एमईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.टेक. पूर्ण केले होते.

आयटी क्षेत्रातील कामाचा ताण?

फरहानाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "दोघांमध्ये खूप प्रेम होते आणि कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनात कोणताही वाद नव्हता. अस्लमवर गेल्या दीड वर्षांपासून नैराश्यावर उपचार सुरू होते. आयटी क्षेत्रातील प्रचंड मानसिक व कामाच्या ताणामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले असावे," असा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी फरहानाचा २८ वा वाढदिवस होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT