Crime News
गुरुग्राम: कौटुंबिक वादातून एका खासगी कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्याने संतापाच्या भरात पत्नी आणि मुलाची गोळ्या घालून हत्या केली. शनिवारी रात्री हरियाणातील गुरुग्राम येथे ही धक्कादायक घटना घडली. आशा राणी तंवर (वय ५२) आणि त्यांचा मुलगा प्रशांत तंवर (वय २७) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पती अनिल तंवर (वय ५६) यांना अटक करण्यात आली आहे.
आशा राणी या कार्टरपुरी गावातील लॉर्ड शिवा पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या, तर प्रशांत शाळेच्या व्यवस्थापनात त्यांना मदत करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अशोक विहार फेज-३ येथील तंवर कुटुंबाच्या तीन मजली घरात ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावर आशा राणी आणि त्यांचे पती अनिल तंवर होते. त्याचवेळी मुलगी, जावई आणि प्रशांतची पत्नी घराच्या इतर मजल्यांवर उपस्थित होते.
मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाल्याचे ऐकून कुटुंबीय वर गेले. त्यावेळी अनिल तंवर यांनी पत्नीला थप्पड मारल्याचे तिने पाहिले. परिस्थिती शांत करण्यासाठी प्रशांत मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला. मात्र, संतापलेल्या अनिल यांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणून पत्नी आणि मुलावर गोळीबार केला.
या हल्ल्यात आशा राणी यांच्या हात, डोके आणि पाठीवर चार गोळ्या लागल्या, तर प्रशांतच्या डोके, चेहरा, छाती, पाठ आणि पायांवर तब्बल सात गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरून पोलिसांनी १४ रिकामे काडतुसे जप्त केली आहेत.
गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी घराबाहेर जमा झाले आणि पोलिसांना माहिती दिली. आशा राणी आणि प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मुलीच्या तक्रारीवरून सेक्टर-५ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.