राजकोट: गुजरातमधील जुनागडपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या एका गावात क्रूरतेची भयावह घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय मुलाने आपल्या मोठ्या भावाची लोखंडी पाईपने डोक्यात वार करून ठार मारले. नंतर त्याने त्याच्या घाबरलेल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार केला आणि निर्घृणपणे हत्या केली.
ही हृदयद्रावक घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली. मृत महिलेच्या माहेरच्या लोकांना संशय आल्याने त्यांनी बिहारमधून विसावदर पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली, त्यानंतर हत्येचा खुलासा झाला. पोलिसांनी या दाम्पत्याचे मृतदेह घरामागे पुरलेल्या ठिकाणातून बाहेर काढले. तपासादरम्यान या क्रूर कृत्याचा कोणताही पश्चाताप मुलाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासानुसार, १५ वर्षीय मुलगा एका दुग्धशाळेत काम करत होता. तो मोठ्या भावाचा तीव्र द्वेष करत होता. कारण त्याचा भाऊ त्याला वारंवार मारहाण करायचा आणि गोठ्यात काम करून कमवलेले पैसे काढून घ्यायचा. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले की, भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. भावाला मारताना वहिनीने पाहिले. त्याचा राग पाहून ती सोडण्याची विनंती करू लागली. त्याने सांगितले की जर तिने त्याच्याशी संबंध ठेवले तर तो तिला सोडून देईल. सहा महिन्यांच्या गर्भवती वहिनीवर त्याने बलात्कार केला. नंतर, ती सर्वांना सांगेल या भीतीने तिच्या पोटात गुडघा मारला आणि गळा दाबून खून केला. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी सांगितलं की, महिलेची इतक्या क्रूरतेने हत्या करण्यात आली की तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर आला होता.
हत्येनंतर मुलाने पाच फूट खोल खड्डा खणून मृतदेह पुरले. त्याने त्यांचे कपडे जाळले आणि रक्ताचे डागही पुसले. गुन्हा घडला तेव्हा त्याची आई घरातच होती. तिने मृतदेह पुरण्यास मदत केली. पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली तिलाही अटक करण्यात आली आहे.
दिवाळीच्या वेळी संपर्क न झाल्याने महिलेच्या आई-वडिलांना संशय आला. त्यांनी मुलाच्या आईला फोन केला, तेव्हा तिने सांगितले की, तिचा मुलगा आणि सून यांचा उत्तर गुजरातमधील हिंमतनगरजवळ रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला आहे. माहेरच्यांनी अपघाताचे फोटो किंवा कागदपत्रे मागितल्यावर आईने उत्तरे देणे टाळले. यामुळे संशय आल्याने बिहारमधून ते विसावदरला आले आणि पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास केला असता, हिंमतनगरमध्ये असा कोणताही अपघात किंवा मृत्यूची नोंद झाली नव्हती. पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या आईला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. स्वतंत्र चौकशीदरम्यान हळूहळू सत्य समोर आले आणि मुलाने अखेरीस हत्येची कबुली दिली.