‘आम्ही जगभर पसरलो आहोत’ रोज एकाचा मुडदा पाडू शकतो...आई-वडिलांच्या अटकेवर गँगस्टरची थेट पोलिसांना धमकी  File Photo
राष्ट्रीय

‘आम्ही जगभर पसरलो आहोत’ रोज एकाचा मुडदा पाडू शकतो...आई-वडिलांच्या अटकेवर गँगस्टरची थेट पोलिसांना धमकी

संतापलेल्या कुख्यात गँगस्टर गोल्डी बराडची पोलिसांना धमकी, ऑडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

goldy brar threatens punjab police and government after his old father and mother arrested

चंदीगड : पुढारी ऑनलाईन

कुख्यात गँगस्टर गोल्डी बराडच्या आई-वडीलांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यामुळे गँगस्टर गोल्डी बराड चांगलाच भडकला आहे. त्‍याने थेट पंजाब पोलिसांनाच धमकी दिली आहे.

खंडणी प्रकरणात गँगस्टर गोल्डी बराडच्या पालकांना अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओमध्ये स्वतःला गोल्डी बराड म्हणवणारा एक व्यक्ती पंजाब सरकार आणि पोलिसांना धमकी देताना ऐकू येतो. मात्र, हा आवाज प्रत्यक्षात बराडचाच आहे की नाही, याची पोलिसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये असेही म्हटले आहे की पोलिस आणि विविध तपास यंत्रणांच्या सर्व प्रयत्नांनंतरही माझ्यापर्यंत पोहोचता आले नाही, म्हणून माझ्या वृद्ध आई-वडिलांना लक्ष्य करण्यात आले. तसेच, त्याच्या पालकांना हरमंदिर साहिबमध्ये दर्शनासाठी गेले असताना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑडिओमध्ये हा संदेशही देण्यात आला आहे की आरोपीचे नेटवर्क केवळ पंजाबपुरते मर्यादित नसून देश-विदेशात पसरलेले आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे

ऑडिओ क्लिपमध्ये गोल्डी बराड म्हणतो की, “मी पंजाब सरकारला सांगू इच्छितो की, जर तुमच्यात हिंमत असेल तर योग्य काम करा आणि थेट माझ्याशी सामना करा. तुम्ही सर्व एजन्सी आणि पोलिसांचा वापर केला, तरीही तुम्ही मला पकडू शकला नाही. आता तुम्ही माझ्या वृद्ध आई-वडिलांना हरमंदिर साहिबमधून दर्शनासाठी गेले असताना अटक केली.” पुढे तो म्हणतो, “तुम्ही फक्त पंजाबपुरते मर्यादित आहात, आम्ही संपूर्ण जगात पसरलेलो आहोत.”

ही ऑडिओ क्लिप त्या दिवशी समोर आली, ज्या दिवशी मोहालीतील डीआयजी आणि एसएसपी कार्यालयांच्या गेटबाहेर एका विचाराधीन कैद्याची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानंतर बराडविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. मृत गुरविंदर सिंग हा 2020 मध्ये झालेल्या गुरलाल बराडच्या हत्येचा आरोपी होता. गुरलाल बराड हा गोल्डी बराडचा चुलत भाऊ होता. या हत्येनंतर बराडने सोशल मीडियावर पोस्ट करत गुरलालच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा केला होता.

पोलिसांनी काय सांगितले

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समोर आलेल्या ऑडिओमध्ये सरकारने अशा प्रकारची पावले उचलू नयेत, अन्यथा प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल, असे कथितपणे म्हटले आहे. ऑडिओमध्ये दररोज एका व्यक्तीची हत्या करण्यासारखी गंभीर धमकीही दिल्याचा उल्लेख आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले जात असून तांत्रिक तपासणीनंतरच कोणताही निष्कर्ष काढला जाईल. पंजाब पोलिसांचे म्हणणे आहे की, कायदा-सुव्यवस्थेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील आणि कोणत्याही धमकी किंवा दबावापुढे झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT