GhostPairing WhatsApp Scam file photo
राष्ट्रीय

GhostPairing WhatsApp Scam: काय आहे GhostPairing? OTP किंवा सिम कार्डशिवाय व्हॉट्सॲप होतंय हॅक!

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) भारतीय व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक सूचना जारी केली आहे

मोहन कारंडे

GhostPairing WhatsApp Scam

नवी दिल्ली: इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) भारतीय व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक सूचना जारी केली आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका नवीन 'डिव्हाइस-लिंकिंग' फीचरबद्दल इशारा देण्यात आला आहे. 'घोस्ट पेअरिंग' नावाच्या एका नवीन सायबर हल्ल्याद्वारे हॅकर्स पासवर्ड किंवा ओटीपीशिवाय तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करू शकतात. हा अतिगंभीर धोका असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

कसा होतो हा 'GhostPairing' हल्ला?

CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, या स्कॅमची सुरुवात अतिशय साध्या मेसेजने होते. वापरकर्त्याला त्याच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून व्हॉट्सॲप वर "Hi, check this photo" असा मेसेज येतो. या मेसेजमध्ये एक लिंक असते, जी फेसबुकच्या एखाद्या पोस्टसारखी दिसते. वापरकर्त्याने या लिंकवर क्लिक केल्यास त्याला फेसबुकसारख्या दिसणाऱ्या एका बनावट पेजवर नेले जाते आणि फोटो पाहण्यासाठी 'ओळख पटवण्याचे' आवाहन केले जाते. येथेच हॅकर्स व्हॉट्सॲपच्या 'लिंक डिव्हाइस' या सुविधेचा गैरवापर करतात. वापरकर्त्याला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायला सांगून हॅकर्स त्यांचे स्वतःचे ब्राउझर पीडित व्यक्तीच्या व्हॉट्सॲपला 'लिंक्ड डिव्हाइस' म्हणून जोडून घेतात. विशेष म्हणजे, यासाठी वापरकर्त्याचा पासवर्ड चोरण्याची किंवा सिम कार्ड बदलण्याची गरज हॅकर्सना भासत नाही.

हॅकर्सकडे असतो तुमच्या खात्याचा पूर्ण ताबा

एकदा का तुमचे खाते 'हायजॅक' झाले की, हॅकर्सना तुमच्या व्हॉट्सॲपचा पूर्ण ॲक्सेस मिळतो. यामध्ये ते तुमचे सर्व जुने आणि नवीन मेसेज वाचू शकतात. तुमचे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट्स पाहतात. तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवू शकतात. किंवा तुमचे वैयक्तिक चॅट्स आणि ग्रुपमधील चर्चांवर लक्ष ठेवतात.

बचाव कसा कराल?

१. संशयास्पद लिंक टाळा: ओळखीच्या व्यक्तीकडून लिंक आली असली, तरी त्यावर क्लिक करण्यापूर्वी खात्री करा.

२. फोन नंबर शेअर करू नका: व्हॉट्सॲप किंवा फेसबुकशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही अनोळखी वेबसाइटवर तुमचा मोबाईल नंबर टाकू नका.

३. लिंक्ड डिव्हाइसेस तपासा: नियमितपणे व्हॉट्सॲपच्या Settings > Linked Devices मध्ये जाऊन तपासा. तिथे तुम्हाला अनोळखी ब्राउझर किंवा डिव्हाइस दिसल्यास त्वरित 'Log Out' करा.

४. सुरक्षा सेटिंग्ज: व्हॉट्सॲपमध्ये 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' नेहमी सुरू ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT