Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: धक्कादायक! ४ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याचा आधी लैंगिक अत्याचार, नंतर दगडाने डोकं फोडलं

चॉकलेटचे आमिष दाखवून एका ४ वर्षांच्या चिमुरडीचे शेजाऱ्याने अपहरण केले, त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

गाझियाबाद: चॉकलेटचे आमिष दाखवून एका ४ वर्षांच्या चिमुरडीचे शेजाऱ्याने अपहरण केले, त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, चकमकीदरम्यान तो जखमी झाला आहे.

ही घटना गाझियाबादमधील एका परिसरात घडली. चिमुरडीचा घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर झुडपांमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. आरोपी हा २४ वर्षीय कारखान्यात काम करणारा कामगार असून, तो त्याच भागात राहणारा शेजारी आहे.

पोलिसांना ‘डायल ११२’ वर एका गंभीर जखमी लहान मुलीबाबत कॉल आला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या डोक्यावर खोल जखमा आढळून आल्या होत्या. मुलीचे वडील रोजंदारीवर काम करतात. त्यांना १२ आणि १० वर्षांची दोन मुले आणि एक ४ वर्षांची मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. वडिलांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे ६ वाजता मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला चॉकलेट आणून देतो असे सांगून सोबत नेले. सायंकाळी ७ वाजता कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नाही. परिसरातील काही मुलांनी आरोपी तिला घेऊन गेल्याचे सांगितले.

वडील आरोपीच्या घरी गेले, पण तो तेथे नव्हता. नंतर नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला. रात्री सुमारे ८.४५ वाजता गावातील एका शेतात आरोपी आढळला. त्याच्याकडे मुलीबद्दल विचारणा केली असता, पुढे गेल्यास ती सापडेल असे त्याने सांगितले. थोड्या अंतरावर कुटुंबीयांना मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली; मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई २०२२ पासून कुटुंबासोबत राहत नाही. त्यावेळी ती चिमुरडी अवघी सहा महिन्यांची होती. तेव्हापासून वडील कामावर गेल्यावर मोठा मुलगा धाकट्या बहिण-भावाची काळजी घेत असे.

या घटनेचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली होती आणि काही तासांतच आरोपीला त्याच्या घराजवळून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नंदग्राम पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT