George Kurian Resignation: केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली.
जॉर्ज कुरियन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते केरळमधील पक्षाचा महत्त्वाचा चेहरा मानले जातात. केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांचा राज्यसभा कार्यकाळ 21 जून रोजी संपुष्टात आल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
भाजपने यापूर्वीच संकेत दिले होते की जॉर्ज कुरियन यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाणार नाही. त्यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
65 वर्षीय जॉर्ज कुरियन हे 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून पक्षाशी जोडलेले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एट्टुमानूर येथे 20 सप्टेंबर 1960 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी कायद्याचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून दीर्घकाळ पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
9 जून 2024 रोजी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर 11 जून 2024 रोजी त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला होता.
यापूर्वी ते राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. तसेच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ओ. राजगोपाल यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राज्यसभा सदस्यत्व संपुष्टात आल्यामुळे केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागले असले तरी भाजपमधील त्यांचे राजकीय महत्त्व कायम असल्याचे मानले जात आहे.