Gen-Z pinterest
राष्ट्रीय

Gen-Z तरुणांना पत्नी कशी हवीय? सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक मानसिकता!

नव्या युगातील या तरुणांचे विचार अनेक बाबतीत आजही जुन्या आणि पितृसत्ताक रूढींना चिकटून असल्याचे दिसून आले आहे.

मोहन कारंडे

लंडन: Gen-Z म्हणजेच १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली तरुण पिढी अत्यंत पुरोगामी विचारांची आहे, ही पिढी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करते, असे मानले जाते. मात्र, एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष वेगळे आहेत. नव्या युगातील या तरुणांचे विचार अनेक बाबतीत आजही जुन्या आणि पितृसत्ताक रूढींना चिकटून असल्याचे दिसून आले आहे.

'इप्सोस', 'किंग्स कॉलेज लंडन' आणि 'ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर विमेन लीडरशिप' यांनी संयुक्तपणे २९ देशांतील सुमारे २३,००० लोकांवर हे सर्वेक्षण केले. लिंग समानता आणि नात्यांमधील भूमिकांबाबत तरुणांचा दृष्टिकोन जाणून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

१. Gen-Z ला कशी पत्नी हवीय?

या अहवालानुसार, ३१% जेन-जी तरुणांचे असे मत आहे की, पत्नीने नेहमी पतीच्या आज्ञेत राहिले पाहिजे. इतकेच नाही तर, ३३% तरुणांच्या मते कुटुंबातील महत्त्वाच्या विषयांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पतीलाच असावा. विशेष म्हणजे, याच वयोगटातील केवळ १८% तरुणी या मताशी सहमत आहेत.

२. करिअर आणि स्वातंत्र्य: दुटप्पी भूमिका?

काम करणाऱ्या महिलांबाबत मात्र काही प्रमाणात सकारात्मक दृष्टिकोनही दिसून आला. सर्व्हेनुसार Gen-Z मधील सुमारे ४१ टक्के पुरुषांना यशस्वी करिअर असलेल्या महिला अधिक आकर्षक वाटतात. तुलनेत १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेल्या ‘बेबी बूमर’ पिढीतील केवळ २७ टक्के पुरुषांनी असे मत व्यक्त केले.

महिलांच्या स्वातंत्र्याबाबत काही तरुण अजूनही संकोची दृष्टिकोन ठेवतात. Gen-Z मधील सुमारे २४ टक्के पुरुषांचे मत आहे की महिलांनी खूप जास्त स्वतंत्र किंवा स्वावलंबी असू नये. बेबी बूमर पिढीत हा आकडा १२ टक्के आहे. महिलांमध्ये मात्र या मताला तुलनेने कमी पाठिंबा मिळाला. Gen-Z मधील सुमारे १५ टक्के महिलांनी आणि बेबी बूमर पिढीतील ८ टक्के महिलांनी या मताशी सहमती दर्शवली.

३. 'मर्दानगी'च्या जुन्याच व्याख्या

पुरुषांच्या वर्तणुकीबाबतही या तरुणांचे विचार आजही पारंपारिक चौकटीत अडकलेले आहेत. ४३% तरुणांच्या मते, पुरुषांनी स्वभाव नसला तरीही मुद्दाम 'राकट' दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ३०% तरुणांना आपल्या पुरुष मित्रांना 'आय लव्ह यू' म्हणणे किंवा भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते.

४. मुलांचे संगोपन आणि पुरुषत्व

सर्वात धक्कादायक निष्कर्ष मुलांच्या संगोपनाबाबत समोर आला आहे. २१% जेन-जी तरुणांना असे वाटते की, जो पुरुष मुलांची काळजी घेतो किंवा घरकामात मदत करतो, त्याचे पुरुषत्व कमी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जुन्या पिढीतील केवळ ८% पुरुषांचे असे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT