Gautam Adani healthcare temples Rs. 60000 crore investment AI hospitals in Mumbai Ahmedabad
पुढारी ऑनलाईन डेस्क ः उद्योगपती गौतम अदानी यांनी आज एक भव्य आणि दूरदृष्टीपूर्ण आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पाची घोषणा केली असून, त्यांनी आपल्या कुटुंबातर्फे तब्बल 60000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प केवळ एक वैद्यकीय सेवा केंद्र न राहता, तो "उद्यमशील क्रांती" घडवणारा उपक्रम ठरेल, असे अदानी यांनी स्पष्ट केले.
या गुंतवणुकीअंतर्गत 'Adani Healthcare Temples' या नावाने 1000 खाटांची एकात्मिक रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. प्रारंभी मुंबई आणि अहमदाबाद येथे हे रुग्णालय प्रकल्प साकारले जातील. या रुग्णालयांचे डिझाईन जगप्रसिद्ध अमेरिकन मेयो क्लिनिक यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये केवळ उपचारच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधून जागतिक दर्जाचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया प्रणाली, ग्रामीण मोबाइल थिएटर्स आणि स्केलेबल आरोग्य सुविधा असतील.
मुंबईतील आघाडीच्या शल्यचिकित्सकांसमोर भाषण करताना अदानी म्हणाले, "भारताला आता आरोग्याच्या क्षेत्रात उत्क्रांती नव्हे, तर क्रांतीची गरज आहे. आरोग्य क्षेत्र पुरेसे पुढे गेलेले नाही; म्हणून आम्ही पुढे येत आहोत."
ते पुढे म्हणाले की, "भारत spinal epidemic चा सामना करत आहे. पाठदुखी ही देशातील अपंगत्वाची प्रमुख कारणे आहे. जर आपले नागरिक उभे राहू शकले नाहीत, तर भारत उभा कसा राहील?"
ही संपूर्ण योजना अदानी कुटुंबाच्या आधीच्या 60000 कोटींच्या सामाजिक बांधिलकीच्या घोषणेचा भाग आहे, जी आरोग्य, शिक्षण व कौशल्य विकासासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश सध्याच्या संस्थांशी स्पर्धा करणे नसून, प्रणालीतील कमतरता भरून काढणे, असे अदानी यांनी स्पष्ट केले.
गौतम अदानी यांनी या उपक्रमाला "भारताच्या उभारणीसाठी आवश्यक ‘कणा’ उभारणी असे संबोधले आहे. हे पाऊल त्यांच्या 1 लाख कोटी रुपयांच्या पुढील 5 वर्षातील गुंतवणूक योजनेचा एक भाग आहे, ज्यातून ते ऊर्जा, पायाभूत सुविधा यांच्यापलीकडे जाऊन सामाजिक परिणाम करणाऱ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छित आहेत.