जोधपूर : वृत्तसंस्था
राजस्थानच्या जोधपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराला कंटाळून मोठ्या बहिणीने आत्महत्या केली होती. आता तिच्या मृत्यूला दोन महिने होत नाही तोच, तिच्यासाठी न्याय मागणाऱ्या लहान बहिणीनेही शुक्रवारी विषारी द्रव पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच आमच्या दोन्ही मुली गेल्याचा गंभीर आरोप आता पीडितेच्या कुटुंबाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिपाल नावाच्या सर्व्हिस सेंटर चालकाने मोठ्या बहिणीचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केले होते. त्यानंतर एकूण ८ आरोपींनी वर्षानुवर्षे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि पैशांचीही वसुली केली.
या त्रासाला कंटाळून तिने २० मार्च रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी ११ एप्रिल रोजी लहान बहिणीने पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली होती. मात्र, एफआयआर नोंदवूनही पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.
लहान बहिणीला केले टार्गेट
पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे आरोपींचे धाडस आणखी वाढले. न्यायासाठी लढणाऱ्या लहान बहिणीलाच त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली आणि तिच्यावरही लैंगिक अत्याचार केले. वारंवार सुरक्षेची मागणी करूनही पोलिसांनी मदत न केल्याने अखेर हताश होऊन या तरुणीने शुक्रवारी एका पाण्याच्या टाकीवर चढून विषारी द्रव प्राशन केले, असे ता पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दोन आरोपी अटकेत
या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रकरण अंगाशी आल्याचे पाहताच जोधपूर पोलिसांनी तातडीने हालचाली करत मुख्य आरोपी महिपाल याच्यासह आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले.