राष्ट्रीय

FREE TRAIN TRAVEL: तिन्ही सैन्यदलातील शूरवीरांना सरकारची भेट; आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास, निकष काय?

Ministry of Defence News: तिन्‍ही सैन्यादलांतील शूरवीरांसह कुटुंबीयांना मिळणार सुविधा

पुढारी वृत्तसेवा

Gallantry Award Winners Free Train Travel : केंद्र सरकारने तीनही सैन्यादलांतील शौर्य पुरस्कार विजेते आणि त्यांच्या पात्र कुटुंबीयांसाठी आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा सुरू केली आहे. या लाभांतर्गत प्रथम श्रेणी (First Class), द्वितीय एसी (Second AC) आणि एसी चेअर कारमधील प्रवासाचा समावेश असून हा लाभ त्यांच्या कुटुंबातील काही विशिष्ट श्रेणीतील सदस्यांना मिळणार आहे.

शूर जवानांचा होणार सन्मान

भारताच्या शूर जवानांचा सन्मान करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयात, केंद्र सरकारने भूदल, नौदल आणि वायुसेनेच्या शौर्य पदक विजेत्यांसाठी आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवासाला मंजुरी दिली आहे. हा लाभ त्यांच्या कुटुंबातील काही विशिष्ट श्रेणीतील सदस्यांपर्यंत देखील वाढवला जाईल. हा निर्णय देशाच्या शूरवीरांसाठी एक मोठा कल्याणकारी निर्णय आहे. अद्भूत शौर्य दाखवणाऱ्यांच्या कुटुंबीयांना सन्मान आणि पाठबळ मिळावे, हा यामागचा उद्देश असल्याचेही केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

कोणाला मिळणार 'या' योजनेचा लाभ?

  • केंद्राने अधिसूचित केलेल्या सुधारित नियमांशी संबंधित माहितीनुसार, खालील श्रेणीतील व्यक्ती या मोफत प्रवास सुविधेसाठी पात्र असतील:

  • शौर्य पुरस्कार विजेते: सैन्यादलातील सर्व कर्मचारी ज्यांना शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

  • पती/पत्नी: मृत पुरस्कार विजेत्याची विधवा किंवा विधुर (पुनर्विवाह करेपर्यंत पात्र).

  • पालक: मरणोत्तर पुरस्कार दिला गेला आहे आणि पुरस्कार विजेता अविवाहित होता, तेथे आईवडील या लाभासाठी पात्र असतील.

भारतीय रेल्वेतील पात्र प्रवास श्रेणी

या नवीन सुविधेअंतर्गत, लाभार्थ्यांना एका सहकाऱ्यासह भारतीय रेल्वेने आयुष्यभर मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. ही सुविधा खालील श्रेणींना लागू होईल

  • प्रथम श्रेणी (First Class)

  • द्वितीय एसी (Second AC)

  • एसी चेअर कार (AC Chair Car)

सन्‍मानित जवानांसह कुटुंबीयांचा आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध

देशातील सन्मानित जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक आणि आरामदायी प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देणे हा या सवलतीचा उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे की ही योजना तातडीने लागू झाली आहे. या योजनेचा फायदा हजारो लष्करी कुटुंबीयांना होण्याची शक्यता असून, हा उपक्रम जवानांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल देशाची कृतज्ञता व्यक्त करतो, असा पुनरुच्चार अधिकाऱ्यांनी केला आहे.

शौर्य पुरस्कार.... शौर्य, कल्‍पकता आणि त्‍यागासाठीचे सर्वोच्‍च सन्‍मान

भारतातील शौर्य पुरस्कार हे कर्तव्य बजावताना सैन्यादलातील सदस्यांनी दाखवलेले असाधारण शौर्य, कल्पकता आणि त्यागासाठी देशाचा सर्वोच्च सन्मान दर्शवतात. युद्ध, बंडखोरी विरोधी ऑपरेशन्स आणि इतर आव्हानात्मक मोहिमांदरम्यान शौर्याच्या कृत्यांचा सन्मान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र यांचा समावेश आहे. हे पुरस्कार केवळ युद्धभूमीवर गाजवलेल्या पराक्रमासाठीच नाही, तर युद्धभूमीबाहेर किंवा प्रत्यक्ष रणसंग्रामापासून दूर दाखवलेल्या असाधारण धैर्यासाठीही दिले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT