Petrol Diesel Price Hike Pudhari
राष्ट्रीय

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले; दोन आठवड्यांत चौथ्यांदा वाढ

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे.

मोहन कारंडे

Petrol Diesel Price Today:

नवी दिल्ली: देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. नव्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रति लीटर २.६१ रुपयांनी, तर डिझेल प्रति लीटर २.७१ रुपयांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत झालेली ही चौथी दरवाढ आहे.

सुमारे दोन आठवड्यांच्या खंडानंतर १५ मे पासून इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा दरवाढीचे सत्र सुरू केले आहे. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर तब्बल ७.५ रुपयांची एकूण वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे ऐन लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीवर होणार असून, येत्या काळात सर्वसामान्यांचे घरगुती बजेट आणि वाहतूक खर्च कमालीचा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर २.६१ रुपयांनी वाढून ९९.५१ रुपयांवरून १०२.१२ रुपयांवर पोहोचले आहेत; तर डिझेलचे दर २.७१ रुपयांनी वाढून ९२.४९ रुपयांवरून ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहेत.

दरवाढीचे मुख्य कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत झालेली मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण यामुळे तेल कंपन्यांचा आयात खर्च कमालीचा वाढला आहे. याच वाढत्या खर्चामुळे तेल कंपन्यांनी ही दरवाढ लागू केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारातील ही अस्थिरता अशीच राहिल्यास येत्या काळात सर्वसामान्यांना आणखी दरवाढीचे चटके सोसावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT