नवी दिल्ली: सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपये प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सरकारी तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ आहे.
15 मेपासून दरांचा आलेख चढताच
इंधन दरातील ही वाढ 15 मेपासून सुरू झाली असून, आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 7.5 रुपयांची एकूण वाढ झाली आहे. या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महागाई आणि विविध क्षेत्रांतील वाहतूक खर्च वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही काळापासून स्थिर असलेले इंधनाचे दर 15 मे रोजी प्रथमच पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रत्येकी 3 रुपयांनी वाढवण्यात आले. त्यानंतर 19 मे रोजी 90 पैसे आणि 23 मे रोजी पेट्रोलमध्ये 87 पैसे, तर डिझेलमध्ये 91 पैशांची वाढ झाली.
ताज्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 99.51 रुपयांवरून 102.12 रुपये, तर डिझेल 92.49 रुपयांवरून 95.20 रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपयांवर पोहोचले आहे. कोलकात्यात पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये, तर चेन्नईत पेट्रोल 107.77 रुपये आणि डिझेल 99.55 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. राज्यांच्या स्थानिक करांमधील तफावतीमुळे इंधनाचे दर वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे आहेत.
इराण युद्धामुळे भडकत चाललेल्या महागाईच्या आगीत तेल कंपन्यांनी दोन आठवड्यात सलग चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल ओतल्याने ही महागाई आता स्वयंपाकघरात थेट ताटावर येऊन बसली आहे. इंधन महागल्याने भाजीपाला कडाडला, खाद्यतेल तडकले आणि किराणा मालाचे दरही वाढलेले दिसतात. ऐसपैस मोकळ्या हाताने खर्च करण्याची चिंता सोडा, महामुंबईत रोजचे जगणे आता महाग होत चालले आहे. या चिंतेने महामुंबईकरांना ग्रासलेले दिसते.
काय काय होणार महाग?
महामुंबई प्रदेशात 51 हजारांवर प्रवासी व मालवाहतुकीची वाहने सीएनजीवर धावतात; तो सीएनजी किलोमागे 3 ते 4 रुपयांनी महागल्याने मालवाहतुकीचे दर वाढले आणि वस्तूंचे दरही बदलले.
अमूल, मदर डेअरी आणि गोकुळ या तिन्ही कंपन्यांचेदूधही लिटरमागे दोन रुपयांनी वाढले आहे.
पॅकबंद तांदुळ गुणवत्तेनुसार 42 ते 150 रुपये किलोने घ्यावा लागत आहे. मालवाहतुकीचे वाढलेले दर आणि इंधन दरवाढ यामुळे हे दर वाढले.
गेल्या दोन आठवड्यांत उष्णतेची लाट आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने रोज लागणाऱ्या भाज्या प्रचंड महागल्या आहेत. अनेक भाज्या 150 रुपये किलोच्याही पुढे गेल्या आहेत. एपीएमसीमध्ये जिथे रोज 550 ते 650 ट्रक यायचे तिथे 300-350 ट्रक येत आहेत. भाज्यांची आवक घटली. फ्रेंच बिन्सचे दर 120 रुपयांवरून 250 रुपये किलोवर, टोमॅटो 25 वरून 50 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाचे दर 10 ते 15 रुपयांनी लिटरमागे तडकले आहेत. जे ब्रॅण्ड 140 ते 145 रुपये लिटरने मिळत ते किरकोळ बाजारात आता 167 ते 187 रुपये लिटरने घ्यावे लागत आहेत. 15किलोंचा कॅन जो 2000 ते 2500 रुपयांना मिळत असे त्यासाठी आता 3000 ते 3500 रुपये मोजावे लागत आहेत.
चांगल्या कंपनीची तूरडाळ किरकोळ बाजारात 100 ते 130 रुपये किलोवर पोहोचली आहे. एपीएमसीतील ठोक दर मात्र 100 रुपये किलोचा आहे.
प्राप्त संकेतानुसार बाटलीबंद पाणी कोणत्याही क्षणी महागण्याची शक्यता आहे. एक लिटरची बाटली 20 रुपयांवरून 25 वर तर 500 मिली लीटरची बाटली 10 वरून 12 रुपयांवर जाऊ शकते.
रोज लागणारा अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण/पावडर, पॅकबंद अन्न पदार्थ आणि घरगुती अत्यावश्यक वस्तूंचे दर एफएमसीजी कंपन्यांनी वाढवले आहेत.