Petrol Diesel Price Hike Pudhari
राष्ट्रीय

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांना झटका: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, पहा तुमच्या शहरातील नवे दर!

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर सुमारे ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे.

मोहन कारंडे

Petrol Diesel Price Hike

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर सुमारे ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी इंधनाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती; त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही नवीन दरवाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलने १०७ रुपयांचा, तर कोलकात्यात १०९ रुपयांचा टप्पा पार केला आहे.

मेट्रो शहरांतील नवे दर काय?

'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी झालेल्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

मुंबई: आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ९१ पैशांनी महागून १०७.५९ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेल ९४ पैशांच्या वाढीसह ९४.०८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

दिल्ली: राजधानी दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी महागले असून नवे दर ९८.६४ रुपये झाले आहेत. डिझेल ९१ पैशांच्या वाढीसह ९१.५८ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

कोलकाता: चार प्रमुख महानगरांमध्ये कोलकात्यात सर्वाधिक दरवाढ झाली आहे. तिथे पेट्रोल ९६ पैशांनी महागून १०९.७० रुपये, तर डिझेल ९४ पैशांच्या वाढीसह ९६.०७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

चेन्नई: चेन्नईत पेट्रोल ८२ पैशांनी महागून १०४.४९ रुपये, तर डिझेल ८६ पैशांच्या वाढीसह ९६.११ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

यापूर्वी, गेल्या शुक्रवारीच इंधनाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत ही दुसरी दरवाढ झाली आहे.

नवीन दर

अ) पेट्रोल

पूर्वी: १०६.९८ रुपये

आता (दरबदलानंतर): १०७.८९ रुपये

+०.९१ ची वाढ

ब) डिझेल

पूर्वीचा दर: ९३.४५ रुपये

वाढीनंतर: ९४.३९ रुपये

+०.९४ ची वाढ

दोन वर्षांनंतर 'जैसे थे' परिस्थिती संपली

२०२२ मधील रशिया-युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी दैनंदिन दरवाढ स्थगित केली होती. मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेल केवळ २ रुपयांनी स्वस्त झाले होते.

मात्र, आता पश्चिम आशियातील संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' मधील संकटामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. फेब्रुवारी महिन्यात भारतासाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ६९ डॉलर होती, ती आता थेट ११३ ते ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.

भारत आपल्या गरजेच्या जवळपास ९० टक्के कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील या वाढीचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर होत आहे.

तेल कंपन्यांवर १ लाख कोटींच्या तोट्याचे सावट

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकताच इशारा दिला होता की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलेले असताना जर देशांतर्गत दर वाढवले नाहीत, तर सरकारी तेल कंपन्यांना एकाच तिमाहीत सुमारे १ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दरांमधील फरकामुळे या कंपन्यांना दररोज तब्बल १,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT