Petrol Diesel Price Hike Pudhari
राष्ट्रीय

Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

पेट्रोल प्रतिलिटर ९७.७७ रुपये, तर डिझेल ९०.६७ रुपयांवर पोहोचले आहे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : एकीकडे महागाईच्या झळा तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमध्ये साधारण ३ रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. आजपासून देशभरात पेट्रोल ३.१४ रुपये व डिझेल ३.११ रुपयांनी वाढले आहेत. म्हणजेच पेट्रोल प्रतिलिटर ९७.७७ वर पोहोचले. तर डिझेल ९०.६७ वर पोहोचले आहे.

सीएनजी (CNG) देखील महागले

केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर वाहनधारकांना सीएनजीच्या दरवाढीचाही फटका बसला आहे. इराण संकटामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा नवीन दर आता ७९.०९ रुपये प्रति किलो झाला आहे.

दरवाढीमागचे प्रमुख कारण: तेल कंपन्यांचा तोटा

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यापूर्वीच दरवाढीचे संकेत दिले होते. त्यांच्या मते; कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना दररोज सुमारे १,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. जर किमती वाढवल्या नसत्या, तर कंपन्यांचा तोटा एका तिमाहीत १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असता. सध्या केलेली दरवाढ ही कंपन्यांच्या एकूण तोट्याच्या तुलनेत अद्यापही कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दर कसे ठरवले जातात?

दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किमतीत उत्पादन शुल्क (Excise Duty), डीलर कमिशन, व्हॅट (VAT) आणि इतर स्थानिक करांचा समावेश झाल्यानंतर, ग्राहकांना मिळणारी किंमत मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट होते.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

वाहतूक खर्च वाढल्याने आगामी काळात भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT