Petrol Diesel Price Hike
नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून स्थिर असलेले इंधन दर आता कडाडण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार येत्या ५ ते ७ दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर या दरवाढीला मंजुरी मिळाली, तर गेल्या जवळपास चार वर्षांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमधील ही पहिलीच वाढ ठरेल; कारण २०२२ पासून किरकोळ विक्री दर बऱ्याच अंशी स्थिर ठेवण्यात आले होते.
पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन वर्षांपासून किरकोळ विक्रीचे दर स्थिर असल्याने तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 'अंडर रिकव्हरी'मुळे कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेच दरवाढ होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते, मात्र आता वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.
सरकार सध्या पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एका बाजूला तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे, असा दुहेरी पेच सरकारसमोर आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतो, त्यामुळे हा निर्णय घेताना मध्यमवर्गीयांच्या बजेटचाही विचार केला जात आहे. येत्या ५ ते ७ दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि कोणत्याही दरवाढीमुळे महागाईत लक्षणीय वाढ होणार नाही याची खात्री करणे, या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.