FSSAI issues notice to 150 companies including Flipkart, Amazon, Coca-Cola
पुढारी ऑनलाईन : FSSAI ने भ्रामक जाहिराती, खोटे दावे आणि चुकीच्या लेबलिंगविरोधात कडक भूमिका घेतली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) 150हून अधिक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये Nestle India, Red Bull India, Monster Energy, Flipkart Minutes आणि Amazon Now यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
FSSAI सध्या भ्रामक जाहिराती, खोटे दावे आणि चुकीच्या लेबलिंगच्या मुद्द्यावर कठोर कारवाई करत आहे. विशेषतः ‘एनर्जी ड्रिंक’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर FSSAIची नजर आहे. PepsiCo, Red Bull India, Monster Energy, Hell Energy, Diageo आणि Pernod Ricard यांसारख्या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
एनर्जी ड्रिंक ब्रँड FSSAIच्या रडारवर आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने यापूर्वीही ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या ब्रँडिंग आणि भ्रामक दाव्यांबाबत सहा प्रमुख कंपन्यांना नोटीस बजावली होती. या कंपन्यांवर उत्पादनांच्या पॅकेजिंग, लेबलिंग आणि जाहिरातींमध्ये अन्न सुरक्षा नियमांनुसार मान्य नसलेले दावे केल्याचा आरोप आहे. आता पुन्हा एकदा FSSAIने या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने अनेक उत्पादने जप्तही करण्यात आली आहेत. इतर कंपन्यांचा विचार केला तर Flipkart Minutes आणि Amazon Now यांना 12 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. Amazonच्या एका वेअरहाऊसचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. तसेच Domino’sचे 5 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
58 आयात केलेल्या उत्पादनांच्या लेबलिंगमध्येही त्रुटी
58 आयात केलेल्या उत्पादनांच्या लेबलिंगमध्येही अनियमितता आढळून आली आहे. त्यानंतर FSSAIने संबंधित कंपन्यांना नोटीस बजावली आहे. Domino’s, KFC, Pizza Hut आणि Costa Coffee यांसारख्या अनेक फूड सर्व्हिस आउटलेट्सनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
याशिवाय उत्पादनांमध्ये कॅलरीची चुकीची माहिती दिल्याप्रकरणीही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. FSSAIची ही कारवाई केवळ एनर्जी ड्रिंक ब्रँड आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांपुरती मर्यादित नाही. Marriott, Hilton, Hyatt, Radisson, Four Seasons आणि Shangri-La यांसारख्या हॉटेल्सनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.