FSSAI hing ban : 'एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स' आणि 'लालजी गोधू' यांनी उत्पादित केलेल्या हिंगाच्या (asafoetida) दर्जाबाबत प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये त्रुटी आढळल्याने, 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI) ने या उत्पादनांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. संबंधित कंपन्यांना नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आणि विहित मानकांचे पालन कसे केले जाईल, याचा तपशीलवार कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बाजारात आधीच उपलब्ध असलेली निकृष्ट दर्जाची उत्पादने स्वेच्छेने परत मागवून घेण्याचा (रिकॉल करण्याचा) सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. नियमांचे पालन करेपर्यंत ही बंदी लागू राहील.
FSSAI ने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनानुसार, एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर प्रमुख हिंग ब्रँड्सचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. कंपन्यांच्या मुंबईतील उत्पादन युनिट्स आणि गुजरातमधील उंबरगाव येथील एव्हरेस्टच्या युनिटमधून गोळा केलेले नमुने निर्धारित मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले.कंपाउंडेड हिंगामध्ये किमान ५ टक्के 'अल्कोहल-सॉलिबल एक्स्ट्रॅक्ट' असणे आवश्यक आहे. कंपाउंडेड हिंग हे रोजच्या वापरासाठी सोपे जावे म्हणून खाण्यायोग्य स्टार्च किंवा पिठात मिसळलेले मिश्रण असते.तपासणीत नमुन्यांमध्ये याचे प्रमाण अवघे ० ते ३ टक्केच आढळून आले. अन्न सुरक्षा नियमकाने दिलेल्या माहितीनुसार, उत्पादक आवश्यकतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी प्रमाणात कच्च्या हिंगाचा वापर करत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
तपासणीदरम्यान लालजी गोधूच्या युनिटमधून घेतलेल्या मूळ हिंगाच्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या नमुन्यांचीही चाचणी करण्यात आली. नियमांनुसार, मूळ हिंगामध्ये स्टार्चचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र, चाचणीत या सहाही नमुन्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत आढळले; म्हणजेच स्टार्चचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त होते. दरम्यान, FSSAI चा हा बंदीचा आदेश केवळ नमूद केलेल्या हिंग उत्पादनांवरच लागू आहे. कंपन्यांचे इतर मसाल्यांचे पदार्थ, अंडी करी मसाला, चिकन करी मसाला आणि गरम मसाला या बंदीच्या कक्षेत येत नाहीत.