बडोदा/कोलकाता : बडोदा येथील प्रताप शाळेत मतदार पडताळणी मोहिमेत बूथ लेव्हल अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना उशाबेन इंद्रसिंह सोळंकी या महिला साहाय्यिकेचा कोसळून मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात या कामाच्या ताणाखाली बूथ लेव्हल अधिकाऱ्याने आत्महत्या केली. यानंतर पश्चिम बंगालमध्ये या मोहिमेविरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यातील बळींची संख्या 12 वर पोहोचली आहे
उशाबेन यांचे पती इंद्रसिंह सोळंकी यांनी, त्यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना ड्युटीवर पाठवल्याचा आरोप केला आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यांच्यावर खूप दबाव होता, असेही नातेवाईकांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या तणावातून बूथ लेव्हल ऑफिसरने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना शनिवारी घडली. जलपाईगुडी जिल्ह्यातील एका बीएलओने जीवन संपविले होते. आतापर्यंत तीन बीएलओंचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोघांनी जीवन संपविले आणि एका अधिकाऱ्याचा कामाच्या असह्य दबावामुळे सेरेब्रल ॲटॅकने मेमारी येथे मृत्यू झाला.
शनिवारी, नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे 53 वर्षीय रिंकू तरफदार यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीत ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास प्रचंड दबाव येईल, तो सहन करणे शक्य नाही, असे लिहिले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एसआयआर’ थांबवण्याची मागणी करणारे पत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिले. ‘एसआयआर’मुळे अधिकारी आणि नागरिकांवर अमानवीय दबाव येत असून, ही प्रक्रिया असुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.