Operation Sindoor
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे जोरदार समर्थन करताना, अमेरिकेच्या एका युद्ध तज्ज्ञाने म्हटले आहे की, भारताने आक्रमण आणि बचावात्मक अशी दोन्ही आघाड्यावर वर्चस्व सिद्ध केले. यामुळे ते पाकिस्तानात कुठेही, कधीही हल्ला करू शकतात, असा संदेश गेला आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, कर्नल (निवृत्त) जॉन स्पेन्सर यांनी म्हटले की, पाकिस्तान वापरत असलेल्या चीनची हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या तोडीची नाही.
"भारताने यशस्वीरित्या पाकिस्तानमध्ये हल्ले केले आणि पाकिस्तानचे ड्रोन हल्ले आणि हायस्पीड क्षेपणास्त्रांचा हल्ला हाणून पाडत स्वतःचा बचावही करण्यात यश मिळवले," असे स्पेन्सर म्हणाले. स्पेन्सर हे मॉडर्न वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्ध अभ्यासाचे प्रमुख म्हणून काम पाहतात.
त्यांनी पुढे असेही म्हटले की पाकिस्तान वापरत असलेली चीनची हवाई संरक्षण यंत्रणा भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये असून हा भारताच्या अत्याधुनिक लष्करी क्षमतेचा पुरावा आहे.
चीनची हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्रे ही भारतीय यंत्रणांच्या तुलनेत कमकुवत आहे. यामुळे भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये चिनी आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा भेदण्याची क्षमता आहे. भारताचा संदेश स्पष्ट होता की, ते पाकिस्तानात कधीही कुठेही मारा हल्ला करु शकतात, असे स्पेन्सर पुढे म्हणाले.
पाकिस्तानने भारतीय लष्करी सुविधांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ल्यांचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे हे हल्ले भारताने हाणून पाडले. तसेच या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून १० मे रोजी भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांसाठी भारताचे सर्वात अचूक शस्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्र होते. ब्रह्मोस हे जगातील सर्वात अचूक, घातक, वेगवान आणि शत्रुंचा थरकाप उडवणारे क्षेपणास्त्र म्हणन ओळखले जाते.
भारताने ७ मे रोजीच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले; तेव्हा पाकिस्तानच्या मूळ चिनी हवाई संरक्षण यंत्रणेला बगल देत भारताने पाकिस्तानच्या आत दहशतवादी तळांवर हल्ले केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला 'दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील एक निर्णायक वळण' असल्याचे स्पेन्सर यांनी म्हटले आहे. याचा फटका पाकिस्तानी सैन्याला बसला.
"भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. भारताचा राजकीय आणि लष्कराकडून स्पष्ट संदेश होता, 'आम्हाला युद्ध नको आहे, पण तणाव न वाढवता आम्ही दहशतवाद नष्ट करु," असे सांगत स्पेन्सर यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले.
भारत- पाक तणावादरम्यानच्या भारताच्या माहिती प्रसारण धोरणाचेही त्यांनी कौतुक केले. या सिंदूर ऑपरेशनचा अभ्यास येत्या काही वर्षांत लष्करी रणनीतीकार आणि विद्यार्थी करतील, असेही स्पेन्सर यांनी नमूद केले.