नवी दिल्ली : माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते कपिल पाटील यांनी आज (दि.२०) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. (Maharashtra Assembly Polls)
पक्षप्रवेशानंतर बोलताना कपिल पाटील म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षात स्वागत केले. देशात राहुल गांधी फॅसिझम विरोधात लढा देत आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटी शर्तीशिवाय आम्ही हा प्रवेश केला आहे. देशात सगळ्या पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. यापुढे पक्षनेतृत्व सांगेल त्या पद्धतीने काम करू, असेही कपिल पाटील म्हणाले.
कपिल पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री सतेज पाटील, सुनील केदार यावेळी उपस्थित होते. (Maharashtra Assembly Polls)