झारखंडमधील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी झारखंड सरकारने मोठी कारवाई केली आहे.  File Photo
राष्ट्रीय

Former JPSC Chairman Arrested : विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाल्‍यानंतर झारखंड सरकारची मोठी कारवाई; JPSC माजी अध्यक्षांना अटक

परीक्षा गैरव्‍यवहारप्रकरणी आतापर्यंत २० संशयित आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

Former JPSC Chairman Arrested : झारखंडमधील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या विधानसभा घेराव आंदोलनादरम्यान हेमंत सोरेन सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) झारखंड लोकसेवा आयोगाचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. ख्यांग्ते यांना अटक केली आहे. या प्रकरणातील सीआयडीची ही २० वी अटक असून, यापूर्वी उपपरीक्षा नियंत्रकासह १९ जणांना गजाआड करण्यात आले आहे.

JPSC माजी अध्यक्षांची अनेकदा झाली होती चौकशी

JPSC चे अध्यक्ष एल. ख्यांग्ते यांनी २२ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २८ जुलैपासून सीआयडीकडून त्यांची वारंवार चौकशी सुरू होती. रविवारी (दि. ९ ऑगस्‍ट) आयोगाच्या अजीता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद या तिन्ही सदस्यांनी राजीनामे दिले. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी हे राजीनामे मंजूर केले आहेत. कथित पेपर लीक आणि इतर अनियमिततांच्या आरोपांखाली सीआयडीने या तिन्ही सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. या तिघांची नियुक्ती सप्टेंबर २०२१ मध्ये झाली होती.

प्रकरणात 'ईडी'ची एन्ट्री

स्पर्धा परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीच्या मागणीवर आंदोलक ठाम असतानाच आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (ED) एन्ट्री झाली आहे. JSSC-CGL परीक्षेसह अन्य भरती परीक्षांमधील आर्थिक गैरव्यवहारांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. सीआयडीने दाखल केलेली एफआयआर आणि इतर तक्रारींची दखल घेत मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) हा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

विद्यार्थ्यांचा विधानसभेवर धडक मोर्चा; पोलिसांकडून लाठीमार

दरम्यान, विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो परीक्षार्थींनी सोमवारी झारखंड विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढला. आंदोलकांनी पोलिसांचे अनेक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे (वाटर कॅनन) सोडले आणि लाठीचार्ज केला. गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे (JLKM) नेते देवेंद्रनाथ महतो रुग्णवाहिकेतून या मोर्च्यात सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT