राष्ट्रीय

Sikkim Election Results 2024 : सिक्कीमचे २५ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले चामलिंग यांचा दाेन्‍ही मतदारसंघात पराभव

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम असलेले सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) पक्षाचे प्रमुख पवन कुमार चामलिंग (Pawan Kumar Chamling) यांना विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात  पराभव पत्करावा लागला आहे. ७४ वर्षीय चामलिंग यांनी सिक्कीमचे सलग २५ वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

चामलिंग (Pawan Kumar Chamling) यांचा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (SKM) चे उमेदवार राजू बस्नेत यांनी नामचेयबुंग मतदारसंघातून २ हजार २५६ मतांनी पराभव केला. तर पोकलोक-कामरंग विधानसभा मतदारसंघात एसकेएमच्या भोजराज राय यांच्याकडून ३ हजार ६३ मतांनी पराभूत झाले आहेत. एकेकाळी सिक्कीममधील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या त्यांच्या डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) ला ३२ पैकी फक्त एक जागा मिळाली आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने या निवडणुकीत पुन्‍हा एकदा एकहाती सत्ता काबीज केली आहे.

मुख्यमंत्री तमांग चामलिंग यांना मानतात राजकीय गुरू

सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) बहुमताने विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री तमांग स्वतः दोन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री तमांग राजकारणात येण्यापूर्वी सरकारी शिक्षक होते. शिक्षक म्हणून काम करण्याऐवजी त्यांना सामाजिक कार्यात अधिक रस होता. यानंतर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) च्या राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेणे सुरू केले. पक्षाचे सदस्य बनले. सरकारी नोकरीचा राजीनामा देत आणि एसडीएफचे स्थायी सदस्यही झाले. चामलिंग एसडीएफचे संस्थापक माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना त्यांचे राजकीय गुरु मानत. चामलिंग यांना राजकीय गुरु मानणारे तमांग यांनी एसडीएफ विरोधातच आवाज उठवला होता. यानंतर, सलग दोन निवडणुकांमध्ये एसकेएमने एसडीएफचा पराभव करून पुन्हा सत्ता काबीज केली.

२०१९ मध्‍ये चामलिंग यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग

२०१९ मध्ये तमांग यांच्या नेतृत्वाखालील एसकेएम पक्ष राज्यात पहिल्यांदाच जिंकला. २४ वर्षे, ५ महिने आणि १५ दिवस सत्तेवर असलेल्या पवनकुमार चामलिंग यांच्या सरकारला सत्तेतून हद्दपार व्हावे लागले होते. एसकेएम १७ जागा जिंकून सत्तेवर आला. पवनकुमार चामलिंग सरकारला पायउतार व्हावे लागले आणि राज्यात प्रेमसिंग तमांग सरकार उदयास आले.

सिक्कीममध्ये पुन्हा तमांग सरकार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसह झालेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांच्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एसकेएमने आतापर्यंत ३२ पैकी १९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एसकेएमला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.र विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) ने फक्त एक जागा जिंकली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT