IRCTC food complaint
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. रेल्वेतील जेवणाच्या निकृष्ट दर्जाबद्दल 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 6645 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली आहे.
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वेतील खानपान सेवेच्या (Catering Service) गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI-M) खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वेतील जेवणाचा दर्जा आणि कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले.
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त झालेल्या एकूण 6645 तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे-
दंड: 1341 प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर (Food Suppliers) दंड ठोठावण्यात आला.
ताकीद: 2995 प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली.
सल्ला: 1547 प्रकरणांमध्ये दर्जा सुधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सूचना देण्यात आल्या.
इतर उपाययोजना: उर्वरित 762 प्रकरणांमध्ये इतर आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्यात आल्या.
खासदार जॉन ब्रिटास यांनी गेल्या पाच वर्षांतील अस्वच्छ अन्नपदार्थ जप्त करण्याच्या घटना आणि प्रवाशांनी दाखल केलेल्या तक्रारींची माहिती मागितली होती. यावर रेल्वेमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
2023-24 ---- 7026 तक्रारी
2022-23 ---- 4421 तक्रारी
2021-22 ---- 1082 तक्रारी
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, प्रवाशांमध्ये जेवणाच्या दर्जाबाबत जागरूकता वाढली असून ते तक्रार करण्यास पुढे येत आहेत.
खासदार ब्रिटास यांनी असाही प्रश्न विचारला होता की, "भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) वंदे भारत आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह अनेक मार्गांवरील कंत्राट एकाच कॉर्पोरेट समूहाला अनेक संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून दिले आहे का?"
यावर उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, "IRCTC नियमितपणे निविदा काढून सेवा पुरवठादारांची निवड करते. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, निविदेतील अटी व शर्तींनुसार सर्वाधिक बोली लावणाऱ्याला कंत्राट दिले जाते.
सध्या 20 विविध कंपन्यांना रेल्वेच्या विविध क्लस्टरमधील कंत्राट देण्यात आले असून, त्याची सर्व माहिती IRCTC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते."
भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नाची तक्रार आल्यास त्वरित दंडात्मक कारवाई केली जाते, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले. तसेच जेवणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनेक उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यापैकी काही प्रमुख उपाय खालीलप्रमाणे:
नियुक्त बेस किचन: रेल्वेने निश्चित केलेल्या बेस किचनमधूनच जेवणाचा पुरवठा केला जातो.
आधुनिक किचन: महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक आणि सुसज्ज बेस किचनची उभारणी करण्यात येत आहे.
CCTV कॅमेरे: बेस किचनमधील स्वच्छतेवर आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
ब्रँडेड कच्चा माल: जेवण बनवण्यासाठी नामांकित आणि लोकप्रिय ब्रँडच्या कच्च्या मालाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा पर्यवेक्षक: प्रत्येक बेस किचनमध्ये अन्न सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी 'फूड सेफ्टी सुपरवायझर'ची नियुक्ती करण्यात आली आहे.