Flipkart Delivery Boy Arrested Pudhari
राष्ट्रीय

Flipkart Delivery Boy Arrested : फ्लॅटमध्ये जबरदस्‍तीने घुसून महिलेचा लैंगिक छळ; 'फ्लिपकार्ट'च्या डिलिव्हरी बॉयला अटक

बंगळूरुमधील प्रकार, वॉशरूम वापरण्याच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये घुसखोरी

पुढारी वृत्तसेवा

Flipkart Delivery Boy Arrested : परवानगीशिवाय फ्लॅटमध्ये घुसून आणि वॉशरूम वापरण्याच्या बहाण्याने लैंगिक छळ केल्याचा आरोप प्रकरणी पोलिसांनी एका डिलिव्हरी एजंटला अटक केली आहे. विजय मल्लिकार्जुन कामथ असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीवरून मराठहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काय घडले होतं?

महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने आरोप केला आहे की, " डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी माझ्या घरी आला. त्यानंतर त्याने मला वॉशरुम वापरू देण्याची विनंती केली. मी अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देत नाही, असे सांगत त्याच्या विनंतीला स्पष्ट नकार दिला. शेजारी राहणाऱ्या पुरुषांची मदत घेण्याचा सल्लाही दिला. मात्र, माझ्या विरोधाकडे दुर्लक्ष करून, त्याने आपल्या चपला बाहेर काढल्या आणि माझ्या संमतीशिवाय तो थेट घरात घुसला."

महिलेला बसला प्रचंड मानसिक धक्का

"वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर त्या डिलिव्हरी बॉयने माझ्यासमोर अश्लील वर्तन केले. या घटनेमुळे मला प्रचंड मानसिक धक्का बसला असून माझ्याच घरात मला असुरक्षित वाटू लागले असल्याची व्यथा मांडत मी स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याने तिथून जायला हवे होते. कोणाच्याही घराच्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा किंवा परवानगीशिवाय घरात घुसण्याचा अधिकार कोणालाही नाही," असेही पीडितेने म्हटले आहे. "मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटत होती. परिस्थिती आणखी बिघडली तर बाहेर पळून जाता यावे आणि मदतीसाठी कोणाला हाक मारता यावी, म्हणून मी माझ्या फोनचा कॅमेरा चालू केला, घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवला आणि मी दरवाजाच्या जवळच उभी राहिले," असेही तिने व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल, गुन्हा दाखल; आरोपी अटकेत

या प्रकरणी बंगळूरु पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "महिलेने फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंट विजय मल्लिकार्जुन कामत याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."

आम्ही अत्यंत व्यथित आहोत : 'फ्लिपकार्ट'

या धक्कादायक घटनेवर प्रतिक्रिया देताना फ्लिपकार्टने म्हटले आहे की, "या घटनेमुळे आम्हाला अत्यंत धक्का बसला असून आम्ही ग्राहकाला पूर्ण सहकार्य करत आहोत. ग्राहकांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही."

आरोपी डिलिव्हरी बॉयची फ्लिपकार्टकडून हकालपट्टी

"हे प्रकरण आमच्या निदर्शनास येताच, आम्ही संबंधित डिलिव्हरी पार्टनरला तातडीने कामावरून काढून टाकले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. आमच्या सर्व डिलिव्हरी पार्टनर्सची कामावर घेण्यापूर्वी पार्श्वभूमी तपासली जाते. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत, परंतु अशी एकही घटना घडणे स्वीकारार्ह नाही. आमच्या ग्राहकांच्या सुरक्षेची यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा सखोल आढावा घेत आहोत," असेही 'फ्लिपकार्ट'ने आपल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT