Female Biker Hit and Run : "गुर्जर कल्याण बैंसला यांना पूर्ण पाठिंबा. एकदा समोरासमोर येऊन त्यांना 'गुंड' म्हणून दाखवाच," अशा धमकीवजा घोषणा देत महिला बायकरला उडवणाऱ्या कारचालकाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणामधील एका उड्डाणपुलावरून अनेक गाड्या एकत्र जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी महिला बायकर शिवानी चौहान (उर्फ सिया) आपल्या बायकर ग्रुपसोबत जात होती. आरोपी कल्याण बैंसलाच्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. कारमधील व्यक्ती मद्यधुंद असल्याचे दिसून आल्याने सियाने त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले. मात्र, बेदरकार कारचालकाने थेट तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सिया रस्त्यावर फेकली गेली आणि कित्येक मीटर घासली गेली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा थरार तिच्या हेल्मेट कॅमेऱ्यात आणि पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बायकरच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही तासांनी सियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. अल्पवधीत तो प्रचंड व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत बैंसला याला अटक केली होती.
"गुर्जर कल्याण बैंसला यांना पूर्ण पाठिंबा. एकदा समोरासमोर येऊन त्यांना 'गुंड' म्हणून दाखवाच," अशा धमकीवजा घोषणा देत महिला बायकरला उडवणाऱ्या कारचालकाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
महिला बायकर शिवानी चौहान (उर्फ सिया)ला उडवल्याप्रकरणी कल्याण बैंसला आणि लवनीश या दोन आरोपींची शुक्रवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. शुक्रवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बैंसला आणि त्याचा चुलत भाऊ लवनीश यांना दिवाणी न्यायाधीश निधी बेनीवाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. यापूर्वी गुरुग्राम न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.