

Hit and Run case : हरियाणातील गुरुग्राममध्ये बेधुंद कार चालकाने महिला बायकरला उडविल्याची घटना ताजी असतानाच आता दिल्लीतील आर.के. पुरम मेट्रो स्टेशनजवळही अशाच प्रकारचा भीषण प्रकार समोर आला आहे. एका कारने उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. यानंतर कार चालकाने न थांबता दुचाकीला काही मीटरपर्यंत फरफटत नेले. सुदैवाने, कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार बाजूला फेकला गेल्याने बचावला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून, तो ७३ वर्षांचा वृद्ध आहे.
आर.के. पुरममधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला वृद्ध कार चालकाच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. कारचालक हात जोडून माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओच्या पुढील भागात, धडकेनंतर कार दुचाकीला फरफटत नेताना दिसते; वाहनाने दुचाकीला बऱ्याच अंतरापर्यंत ओढत नेले. या व्हिडिओची दखल घेत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात १७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आफ्रिका अव्हेन्यू रोडवर, भिकाजी कामा प्लेस ते आर.के. पुरम मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर झाला. तपासात असे समोर आले की, मुनिरका गावातील रहिवासी असलेला तनिष तोकस (वय २१) आपल्या दुचाकीवर रस्त्याच्या कडेला बसला होता. त्याच वेळी, वसंत कुंज येथील रहिवासी असलेल्या वेणू गोपाल (वय ७३) यांनी कारने तनिषच्या दुचाकीला धडक दिली.
धडक बसल्यानंतर तनिष दुचाकीवरून खाली पडला. त्यानंतर कारने दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी स्पष्ट केले की, तनिष बाजूला पडल्याने बचावला. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरिक वृद्ध आरोपीला पकडताना दिसत आहेत. ते त्याला कारमधून बाहेर काढतात आणि माफी मागण्यास भाग पाडतात. या झटापटीदरम्यान, एक महिला मोठ्याने ओरडत असताना आरोपीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारही जप्त करण्यात आली असून, आरोपी चालक वेणू गोपाल याला अटक करण्यात आली आहे. आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली; मात्र, त्यातून मद्यपानाची पुष्टी झाली नाही.