Fastag Annual Pass Price Increase Pudahri
राष्ट्रीय

Fastag Annual Pass Price Increase: टोल नाके कॅशलेस; वार्षिक पास दरात 2.5% वाढ

करविषयक अन्य क्षेत्रातील बदलही लागू, पासच्या किमतीत 2.5% वाढ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: 1 एप्रिलपासून सर्व टोल प्लाझांवर रोख व्यवहार (कॅश ट्रान्झॅक्शन) पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. टोल टॅक्सचे पेमेंट आता फक्त फास्टॅग किंवा यूपीआयसारख्या डिजिटल माध्यमांतूनच करता येईल. शिवाय, फास्टॅगचा वार्षिक पास रिन्यू करताना तुमच्या वॉलेटमधून जास्त पैसे कापले जातील. पासच्या किमतीत 2.5 टक्के वाढ केली आहे.

याशिवाय करविषयक अन्य क्षेत्रातील महत्त्वाचे बदलही लागू झाले आहेत. त्यातील काही बदलांविषयी...

- रेल्वे तिकीट आता फक्त 8 तास आधीच रद्द करता येईल

तिकीट रद्द केल्यावर परतावा (रिफंड) मिळवण्यासाठी रेल्वे सुटण्याच्या किमान 8 तास आधी तिकीट रद्द करणे आवश्यक असेल. आधी ही मुदत 4 तास होती. प्रवासी आता रेल्वे सुटण्याच्या 30 मिनिटे आधीपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील.

- गाड्यांच्या नवीन किमती

कमर्शियल आणि पॅसेंजर गाड्यांच्या किमतीत 2 टक्के ते 3 टक्के वाढ झाली आहे. आता वाढलेली किंमत द्यावी लागेल. शोरूम किमतीसोबतच नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन चार्जेस) सुद्धा वाढलेल्या किमतीवरच आकारले जातील.

- आता फक्त टॅक्स इयर

आजपासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू झाला आहे. आता फायनान्शियल आणि असेसमेंट इयरऐवजी फक्त टॅक्स इयर हा शब्द वापरला जाईल. यामुळे करदात्यांमधील संभ्रम दूर होईल.

- सुधारित कर प्रणालीअंतर्गत रिटर्न फाईलिंग

2025 मध्ये सरकारने नवीन कर प्रणालीच्या टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला होता. तो लागू झाला आहे. पगारदार व्यक्तींसाठी सेक्शन 87 अंतर्गत 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. इतर लोक 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत मिळवू शकतात.

- फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 आणि 131

टीडीएस कपातीच्या पुराव्यासाठी फॉर्म 16 आणि इतर उत्पन्नासाठी फॉर्म 16 अ दिला जात असे. आता या फॉर्म्सचे स्वरूप बदलून फॉर्म 130 आणि फॉर्म 131 करण्यात आले आहे.

- एचआरए कर सवलत नियमात बदल

एचआरएवर कर सवलत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता भाड्याची पावती जमा करणे आवश्यक आहे. जर वार्षिक भाडे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर घरमालकाचा पॅन क्रमांक देणे अनिवार्य असेल.

- फुल अँड फायनल सेटलमेंट 2 दिवसांत होणार

आतापर्यंत नोकरी सोडल्यावर थकबाकी मिळण्यासाठी 90 दिवसांपर्यंत वेळ लागत असे. आता कंपनीला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या कामाच्या दिवसापासून 2 कामकाजाच्या दिवसांत सर्व थकबाकी चुकती करावी लागेल. कंपनीने 2 दिवसांत पेमेंट न केल्यास, कर्मचारी कामगार विभागात तक्रार करून व्याजासह पैशांची मागणी करू शकतो.

- पॅन कार्ड अपडेट

पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्डला जन्मतारखेच्या वैध दस्तऐवजांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. आता आधार फक्त पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल. नवीन पॅन कार्ड काढायचे असेल किंवा जुन्या कार्डवर जन्मतारीख बदलायची असेल, तर आता आधारसोबत इतर दस्तऐवज (उदा., जन्म दाखला किंवा 10 वीची गुणपत्रिका) कागदपत्रे देणे आवश्यक असणार आहे.

बेसिक पे सीटीसीच्या 50 % झाल्यामुळे इन-हँड पगार कमी येणार

नवीन लेबर कोडनुसार, कर्मचाऱ्याचा बेसिक पगार त्याच्या एकूण पॅकेजच्या किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे. कंपन्या भत्ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू शकणार नाहीत. यामुळे हातात येणारा पगार (इन-हँड सॅलरी) कमी होऊ शकतो. कारण, बेसिक पगार वाढल्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युईटीचा वाटा वाढेल. मात्र, याचा मोठा फायदा असा की तुमचा निवृत्ती निधी आणि ग्रॅच्युईटीची रक्कम पूर्वीपेक्षा जास्त वाढेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT