Farsawale Baba death
मथुरा : येथील प्रसिद्ध गोरक्षक बाबा चंद्रशेखर उर्फ ‘फरसा वाले बाबा’ ४५) यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. कोसीकलां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटवन चौकी परिसरात पहाटे घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त लोकांनी बाबांचा मृतदेह महामार्गावर ठेवून रस्ता रोको केला. दरम्यान, दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
ट्रकच्या धडकेत गोरक्षक चंद्रशेखर बाबा यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असून तणाव निर्माण झाला आहे. संतप्त लोकांनी दिल्ली-आग्रा महामार्गावर रोखला. रस्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक कित्येक तास विस्कळीत झाली. फरसा वाले बाबांच्या हत्येवर साधू-संतांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरी गिरी यांनी म्हटलं आहे की, संत समाज या घटनेमुळे अत्यंत दुखावला आहे. या हत्येत जे कोणी सामील असतील, त्यांपैकी एकही गुन्हेगार वाचणार नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी शासन आणि प्रशासनाकडे कठोर पावले उचलावेत."
जुना आखाड्याचे जगद्गुरु स्वामी चक्रपाणी नंद गिरी महाराज यांनी बाबांची हत्या दुर्दैवी असल्याचे म्हटले. "आम्ही राष्ट्र रक्षण, धर्म रक्षण आणि गो रक्षणाबद्दल बोलायचो, पण आता गो रक्षणासोबतच गोसेवकांचेही रक्षण आम्हाला करावे लागेल. लवकरच श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने 'हिंदू स्वाभिमान यात्रा' काढण्यात येईल, ज्यामध्ये राष्ट्र, धर्म, गोवंश, संत आणि धार्मिक स्थळांच्या रक्षणाबाबत जनजागृती केली जाईल.
मथुरा पोलिसांच्या माहितीनुसार, 'गोरक्षक' चंद्रशेखर उर्फ 'फरसा बाबा' यांनी संशयावरून एक वाहन थांबवले होते. या घटनेदरम्यान दाट धुक्यात पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकची त्यांना धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. फरसा वाले बाबा यांनी थांबवलेल्या कंटेनरमध्ये किराणा सामान असल्याचे आढळले आहे. तर त्यांना पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रकमध्ये वायरचे कॉइल्स (गुंडाळ्या) भरलेले होते. हा रस्ते अपघात होता आणि याचा गुरे तस्करीशी कोणताही संबंध नाही, असे मधुरा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, समर्थकांचा असा आरोप आहे की, ही एक पूर्वनियोजित हत्या आहे. तीन हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना मारले. समर्थकांनी एका संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेकडो गोरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ दिल्ली-आग्रा हायवेवर (NH-19) उतरले आणि रस्ता अडवला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा आणि पीएसी (PAC) तैनात करण्यात आली आहे.
या घटनेमुळे दिल्ली-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी पोलीस आणि गोरक्षक यांच्यात चर्चा सुरू आहे. मथुरेसारख्या संवेदनशील जिल्ह्यात ईदच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणत्याही बाह्य शक्तीला कायदा व सुव्यवस्थेशी खेळू दिले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.