२०४१ मध्‍ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ८४ टक्‍के लाेकसंख्‍या ही  मुस्‍लिम असेल,  असा दावा करणारी एक पोस्‍ट सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.
२०४१ मध्‍ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ८४ टक्‍के लाेकसंख्‍या ही मुस्‍लिम असेल, असा दावा करणारी एक पोस्‍ट सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.  Pudhari
राष्ट्रीय

Fact-check : २०४१ मध्‍ये देशातील मुस्‍लिम लोकसंख्‍या ८४ टक्‍के होणार?

पुढारी वृत्तसेवा

इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूटने भाकीत केले आहे की, २०४१ मध्‍ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ८४ टक्‍के लाेकसंख्‍या ही मुस्‍लिम असेल, असा दावा करणारी एक पोस्‍ट सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. जाणून घेवूया या आकडेवारीमागील नेमकी वस्‍तुस्‍थिती काय आहे याविषयी...

व्‍हायरल होणारी पोस्‍ट काय दावा करते?

व्‍हायरल होणारी पोस्‍ट ही भारतातील हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येची १९४८ ते २०४१ पर्यंतच्‍या अंदाजित आकडेवारी सांगते. यासाठी जागतिक लोकसंख्याशास्त्र संशोधन संस्थेचाही संदर्भ दिला आहे. विविध वर्षांमध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येच्या टक्केवारीसह डेटा पॉइंट्सचाही आधार घेण्‍यात आला आहे. 2030 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान निवडला जाईल, असा दावा करुन ही पोस्‍ट किमान दहा जणांना फॉरवर्ड करुन 'राष्ट्र उभारणीत मदत' करा, असे आवाहनही सोशल मीडियावर व्‍हायरल होणारी ही पोस्‍ट करते.

नेमकी वस्‍तुस्‍थिती काय आहे?

२०४१ पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८४ टक्‍के मुस्‍लिम असतील, असा दावा करणार्‍या पोस्‍टमागील नेमकी वस्‍तुस्‍थिती काय आहे, याविषयी BOOM Fact-check ने माहिती घेतली. यासंदर्भात BOOMने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, 'इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट' अशा नावाची कोणतीही संस्‍थाच कार्यरत नाही. सध्‍या उपलब्‍ध असणार्‍या अधिकृत माहितीनुसार, अलिकडच्‍या दशकामध्‍ये सर्व धर्मांमधील लोकसंख्‍या वाढीचा दर घसरला आहे.लोकसंख्याशास्त्रीय संशोधन करणाऱ्या अमेरिकन 'प्यू रिसर्च सेंटर'च्या २०२१ च्या अहवालानुसार, "२०५० पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ १८ टक्‍के मुस्लिम असतील. तसेच २०५० मध्‍ये भारतातील लोकसंख्‍येत ७७ टक्‍के हिंदू, मुस्लिम १८ टक्‍के तर ख्रिश्चन २ टक्‍के असतील."

व्‍हायरल पोस्‍टमधील माहिती चुकीची

व्‍हायरल होणार्‍या पोस्टमध्ये २०११ मध्‍ये भारतातील मुस्लिमाची लोकसंख्येची टक्केवारी २२.६ टक्‍के तर हिंदूंच्‍या लोकसंख्‍येची टक्‍केवारी ७३.२ टक्‍के अशी माहिती आहे. ही माहिती चुकीची आहे. कारण २०११ च्‍या जनगणनेनुसार, देशातील मुस्लिम लोकसंख्या १७.२२ कोटी इतकी असून, याची टक्‍केवारी १४.२ टक्‍के इतकी आहे. तर देशातील हिंदू धर्मियांची लोकसंख्‍या ९६.६३ असून ती एकूण लोकसंख्‍येच्‍या ७९.८ टक्‍के इतकी हाेती.

भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचा वाटा घटला

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली हाेती. त्‍यावेळी देशातील लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती. यापैकी ८४% (३० कोटींहून अधिक लोक) हिंदू समाजाचे होते, तर ३.५ कोटी (९.८%) मुस्लिम होते. 2011 पर्यंत हिंदू लोकसंख्या 96.6 कोटी लोकांपर्यंत वाढली होती आणि मुस्लिम लोकसंख्या 17.2 कोटींहून अधिक झाली होती. भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा 1951 मधील 84% वरून 2011 मध्ये अंदाजे 78% पर्यंत कमी झाला. 2021 मध्ये होणारी जनगणना अद्याप झालेली नाही.

मुस्लिम लोकसंख्‍या वाढीचा दरही घसरला

2015 च्या 'प्यू रिसर्च अहवाला'नुसार, गेल्या तीन दशकांत हिंदूंच्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्‍या वाढीचा दर जास्त प्रमाणात घसरला आहे, 1981-1991 मधील 32.9% वरून 2001-2011 मध्ये 24.6% पर्यंत घसरला आहे. हिंदूंसाठी, याच कालावधीत विकास दर 22.7% वरून 16.8% पर्यंत घसरला. सर्व धार्मिक गटांमधील एकूण प्रजनन दर (टीएफआर) कमी होत आहे. परंतु भारतीय मुस्लिम महिलांमध्ये सर्वात घट झाली आहे, 1992 मध्ये प्रति महिला 4.4 मुले होती 2019-21 मध्ये 2.36 पर्यंत, भारताच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून धर्मानुसार डेटा उपलब्ध असून हिंदूंमध्ये याच कालावधीत प्रति महिला प्रजनन दर 3.3 मुलांवरून 1.94 पर्यंत घसरले आहे.

लोकसंख्‍येच्‍या वस्‍तुनिष्‍ठ आकडेवारीनुसार, लोकसंख्‍या वाढीचा दर हा धर्माशी संबंधित नसून शिक्षण आणि उत्पन्नाशी जोडला गेलेला आहे. भारतात मुस्लीम लोकसंख्येच्या स्फोट झाला आहे, असे दावे सोशल मीडियावर करुन जातीय तणाव निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केले जात असल्‍याचे यापूर्वी स्‍पष्‍ट झाले आहे.

SCROLL FOR NEXT