Shocking Murder Case |
हैदराबाद : दुसऱ्या लग्नाचा राग मनात धरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या ३० वर्षीय पूर्वाश्रमीच्या पत्नीची तीक्ष्ण हत्याराने वार करून आणि डोक्यात कुंडी घालून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली.
सुनीता आणि महेश यांचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. २०२४ मध्ये त्यांनी सामंजस्याने घटस्फोट घेतला होता.
घटस्फोटानंतर एप्रिल २०२५ मध्ये सुनीताने दुसरे लग्न केले होते. याच गोष्टीचा राग महेशच्या मनात होता. सुनीताने महेशविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामुळे महेशचा पासपोर्ट रद्द झाला होता. त्याला परदेशात जाण्यास अडथळे येत होते. यामुळे तो बेरोजगार झाला होता आणि नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
या धक्कादायक प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सुनीता (३०) आयटी इंजिनिअर होती. तिचा माजी पती महेश हाही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने सुनीतावर चाकू आणि विळ्याने सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता त्याने तिच्या डोक्यात फुलांची कुंडी घातली. या भीषण हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
महेशने नियोजित पद्धतीने हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीताचा पत्ता शोधला आणि गेल्या दोन महिन्यांपासून तो हैदराबादमधील एका हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी (दि. १७) तो सुनीता राहत असणार्या प्लॅटमध्ये शिरला. हत्येनंतर पोलिसांनी त्याला परिसरातूनच ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत दोन चाकू, एक ड्रिलिंग मशीन आणि ५ लिटर पेट्रोलचा कॅन आढळून आला आहे, ज्यावरून तो मोठा अनर्थ घडवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सुनीताच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती तीन महिन्यांची गरोदर होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.