Nandani Bosmiya Rajkot Ex AAP candidate file photo
राष्ट्रीय

Crime news: 'आप'च्या माजी महिला उमेदवाराचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह; लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप

आम आदमी पक्षाची (आप) माजी उमेदवार असलेल्या २३ वर्षीय तरुणीचा राजकोटमधील एका फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

पुढारी वृत्तसेवा

Ex AAP candidate Nandani Bosmiya death case

राजकोट: आम आदमी पक्षाची (आप) माजी उमेदवार असलेल्या २३ वर्षीय तरुणीचा राजकोटमधील एका फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नंदनी बोसमिया असे या तरुणीचे नाव असून, २२ जून रोजी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, नंदनीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अस्लम समा नावाच्या तरुणावर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकोटमधील गोंडल चौकाजवळ असलेल्या 'आगमन रेसिडेन्सी'मधील एका फ्लॅटमध्ये रविवारी संध्याकाळी नंदनीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर राजकोट तालुका पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

विवाहित प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची नंदनी

नंदनी बोसमिया ही जेतपूर तालुक्यातील नवगडची रहिवासी होती आणि राजकोटमध्ये एमआर म्हणून कार्यरत होती. गेल्या काही काळापासून ती जुनागढचा रहिवासी असलेल्या अस्लम समा याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नंदनीचे वडील आनंद बोसमिया यांनी आरोप केला आहे की, अस्लम विवाहित असूनही तो नंदनीसोबत राहत होता आणि यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडत असत. अस्लमने तिला अनेकवेळा मारहाण केल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.

त्या रात्री काय घडले?

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन दिवस आधी नंदनी आणि अस्लममध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर ती काही काळ तिच्या एका मानलेल्या भावाकडे राहण्यास गेली होती, पण नंतर पुन्हा फ्लॅटवर परतली. घटनेच्या दिवशी कुटुंबीयांनी नंदनीला वारंवार फोन केला, मात्र तिने फोन न उचलल्याने त्यांना संशय आला. त्यांनी तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला फ्लॅटवर पाहण्यासाठी पाठवले. तेव्हा फ्लॅटमध्ये नंदनीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकत असल्याचे दिसून आले.

कुटुंबीयांचे हत्येचे आरोप आणि संशय

नंदनीच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घटनेच्या वेळी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची कडी केवळ वरून लावलेली होती, तर मागच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा होता. यावरून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अस्लमचे त्याच्या पत्नीसोबतही संबंध सुरू होते आणि याच कारणावरून नंदनीसोबत त्याचे वाद होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

'आप'ची माजी उमेदवार

नंदनी बोसमिया ही स्थानिक पातळीवर राजकीय क्षेत्रात सक्रिय होती. २०२५ मध्ये पार पडलेल्या जेतपूर-नवगड नगरपालिकेच्या निवडणुकीत तिने 'आम आदमी पक्षा'कडून निवडणूक लढवली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचे फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल, फॉरेन्सिक पुरावे आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT