reddit job story
नवी दिल्ली : पहिली नोकरी म्हटलं की प्रत्येकाला भिती, कामाचा ताण आणि नोकरी टीकवण्यासाठी धडपड ही करावीच लागते. पण पहिली नोकरी केवळ तीन तास काम केल्यानंतर सोडल्याचे ऐकलंय का? एका तरुणाने आपल्या पहिल्याच नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर अवघ्या तीन तासांत राजीनामा दिला. रेडिटवर या कर्मचाऱ्याने स्वत:च याबाबत पोस्ट केली आहे.
तरुणाच्या नोकरी सोडण्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर व्यावसायिक वर्तन आणि कामाची नैतिकता यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कमी पगार आणि कामाच्या वेळेमुळे हा निर्णय घेतल्याचे कर्मचाऱ्याने स्पष्ट केले आहे.
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कर्मचाऱ्याने स्वतःच्या अनुभवाबद्दल पोस्ट केली. नोकरी मिळाली, ३ तासांनी सोडली अशी पोस्ट करत त्याने आपली व्यथा मांडली. आज मला पहिली नोकरी मिळाली. हे वर्क फ्रॉम होम होतं आणि कामाचा ताणही कमी होता. पण यामध्ये ९ तासांची शिफ्ट होती, तर पगार मात्र अत्यंत किरकोळ म्हणजे केवळ १२,००० रुपये होता," असे या वापरकर्त्याने लिहिले आहे.
कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, "मला वाटले की मी हे काम करू शकेन, पण केवळ ३ तासांत माझ्या लक्षात आले की यात माझा सर्व वेळ जाईल आणि मला माझ्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे मी लगेचच राजीनामा दिला."
त्यानुसार, कंपनीने सुरुवातीला ही जागा पार्ट-टाइम असल्याचे जाहिर केले होते, परंतु प्रत्यक्षात ते फुल-टाइम काम होते. "मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. मला पार्ट-टाइम नोकरी हवी होती. त्यांनी जाहिरात अर्धवेळची केली आणि काम पूर्णवेळचे दिले. हे मला मान्य नाही," असे त्याने स्पष्ट केले.
कर्मचाऱ्याच्या या निर्णयावर सोशल मीडिया वापरकर्त्यांची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. काहीजण त्याच्या स्पष्ट भूमिका आणि मर्यादांविषयीच्या स्पष्टतेबद्दल कौतुक करत आहेत, तर काहींनी त्याच्या काम करण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.