Pahalgam Terror Attack Jhelum floods in PoK Muzaffarabad
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. तेव्हापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांना आता भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीती वाटत आहे. दरम्यान, शनिवारी (26 एप्रिल) झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पूर आला आहे. पाकिस्तानी मिडियाने आरोप केला आहे की, भारताने अचानक झेलम नदीमध्ये पाणी सोडल्याने ही पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे पीओके राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटी येथे स्थानिक अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरद्वारे इशारा द्यावा लागला. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने लोकांना जागा रिकामी करावी लागली. मुझफ्फराबादमधील एका जिल्हा सरकारी अधिकाऱ्याने संक्षिप्त निवेदन जारी करून नागरिकांना झेलम नदीच्या जवळील ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता उरी धरणातून झेलम नदीत नेहमीपेक्षा पाणी सोडले, ज्यामुळे 1960 च्या सिंधू जल कराराचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मुजफ्फराबाद आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना मोठा झटका बसला आहे. ज्यामुळे तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीसंदर्भात आपल्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्यात सुमारे 45 मिनिटे गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन प्रमुख पर्यायांवर विचार केला गेला. पाकिस्तानकडे एक थेंबही पाणी जाऊ नये असा सरकारचा ठाम निर्धार आहे. बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की पाणी रोखण्यासाठी प्रत्येक शक्य त्या उपायांवर त्वरित काम सुरू करण्यात येईल. अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे घाबरलेल्या पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. यापूर्वी भारतावर खोटे आरोप करणारे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शनिवारी सांगितले की, ‘काश्मीरमधील पहलगाम येथे 26 लोकांच्या हत्येचा निष्पक्ष आणि पारदर्शी तपासासाठी पाकिस्तान तयार आहे. पाकिस्तानने दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला आहे. आमचा देश दहशतवादाचा बळी ठरला आहे,’ काकुल येथील पाकिस्तान मिलिट्री अकादमीतील पासिंग-आउट परेडला संबोधित करताना ते बोलत होते.