EVs AVAS system file photo
राष्ट्रीय

Electric Vehicles: इलेक्ट्रिक गाड्यांचाही येणार आवाज! EV वाहनांना AVAS सिस्टिम बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

EVs AVAS system: 1 ऑक्टोबर पासून बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये AVAS सिस्टिम बसवणे अनिवार्य असेल. ही सिस्टिम काय आहे आणि सामान्य लोकांची कशी सुरक्षा करेल, जाणून घ्या सविस्तर...

मोहन कारंडे

Electric Vehicles AVAS system

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक गाड्या (EVs) पादचारी आणि रस्त्यावरील इतर लोकांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये EV वाहन आल्याचे समजण्यासाठी ऑकस्टिक व्हेईकल अलर्ट सिस्टिम (Acoustic Vehicle Alert System - AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. ही सिस्टिम काय आहे आणि सामान्य लोकांची कशी सुरक्षा करेल, जाणून घ्या सविस्तर.

काय आहे प्रस्ताव?

या नियमानुसार, 1 ऑक्टोबर 2026 पासून बाजारात येणाऱ्या सर्व नवीन प्रवासी आणि मालवाहू इलेक्ट्रिक वाहनांमध्ये AVAS सिस्टिम बसवणे अनिवार्य असेल. तर, आधीपासून उत्पादनात असलेल्या मॉडेल्सना 1 ऑक्टोबर 2027 पर्यंत या नियमाचे पालन करावे लागेल.

AVAS का आहे आवश्यक?

AVAS, इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेषतः आवश्यक आहे, कारण इलेक्ट्रिक वाहने पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा खूप शांत असतात. यामुळे पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वार यांना अपघाताचा धोका वाढतो. AVAS मुळे कमी आवाजात चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचं अस्तित्व समजेल व सुरक्षा अधिक बळकट होईल.

MoRTH च्या अधिसूचनेनुसार, M (प्रवासी वाहने) आणि N (मालवाहू वाहने) श्रेणीतील इलेक्ट्रीफाईड वाहने 1 ऑक्टोबर 2026 पासून नवीन मॉडेल्ससाठी आणि 1 ऑक्टोबर 2027 पासून सध्याच्या मॉडेल्ससाठी AVAS सह उपलब्ध असतील. म्हणजे, इलेक्ट्रिक कार, बस, व्हॅन आणि ट्रक यांना AVAS ने अनिवार्य आहे. पण सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर, थ्री-व्हीलर आणि ई-रिक्षा या नियमातून बाहेर आहेत.

AVAS सिस्टिम कशी काम करते?

ही सिस्टिम वाहन 20 किलोमीटर प्रति तास पेक्षा कमी वेगाने धावत असताना आवाज निर्माण करते, जेणेकरून पादचारी, सायकलस्वार आणि रस्त्यावरील इतरांना वाहन आल्याची जाणीव होईल आणि ते सुरक्षित राहतील. ही सिस्टिम 20 किमी/तास पेक्षा कमी वेगाने आणि वाहन मागे घेताना आपोआप सक्रिय होते. जास्त वेगात टायर आणि हवेचा आवाज पुरेसा असल्याने, ही सिस्टिम बंद होते.

जागतिक अहवाल देखील हेच सांगतात की, इलेक्ट्रिक वाहने कमी वेगात रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी अधिक धोका निर्माण करू शकतात. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पारंपरिक इंजिनऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर होतो. अशा परिस्थितीत, कमी वेगात कारमधून कोणताही आवाज येत नाही, ज्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना किंवा दुचाकीस्वारांना त्यांच्या आसपास किंवा मागून चारचाकी वाहन येत असल्याची जाणीव होत नाही. AVAS आधीपासून अमेरिका, जपान आणि युरोपमध्ये अनिवार्य आहे आणि आता ते भारतातही अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे.

या वाहनांमध्ये आधीपासून आहे AVAS

भारतात काही इलेक्ट्रिक वाहने आधीच AVAS सिस्टिमसह उपलब्ध आहेत. एमजी कॉमेट, टाटा कर्व्ह ईव्ही, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक यांसारख्या मॉडेल्समध्ये AVAS सिस्टिम आहे. याव्यतिरिक्त, महिंद्राने अलीकडेच लॉन्च केलेले XEV 9e आणि BE 6 मध्ये देखील ही सिस्टिम येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT