राष्ट्रीय

EC SSR voter list revision : आता निवडणूक आयोगाकडून १७ राज्यांत होणार मतदारयाद्यांचे 'एसएसआर', 'SIR' आणि 'SSR' मधील फरक काय?

पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार्‍या राज्यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Election Commission SSR voter list revision : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेवरून सुरू असलेला वाद आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच, निवडणूक आयोगाने १७ राज्यांत मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Summary Revision - SSR) जाहीर केली आहे. यामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार्‍या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.

प्रक्रियेसाठी १ जानेवारी २०२७ ही पात्रता निश्चितीची तारीख

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण जाहीर केलेल्‍या १७ राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांत आगामी काळात निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा यांसह संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेसाठी १ जानेवारी २०२७ ही 'कट-ऑफ' तारीख (पात्रता निश्चितीची तारीख) असेल.

सहा महिने आधी निवडणुका घेण्‍याचा आयोगाला अधिकार

उत्तर प्रदेश विधानसभेचा (४०३ सदस्य) सध्याचा कार्यकाळ पुढील वर्षी २२ मे रोजी संपत आहे. मणिपूर (६० जागा), गोवा (४० जागा), पंजाब (११७ जागा) आणि उत्तराखंड (७० जागा) यांच्या विधानसभांचा कार्यकाळही २०२७ च्या मार्च महिन्यात वेगवेगळ्या तारखांना संपणार आहे. 'लोकप्रतिनिधी कायदा, १९५०' (Representation of the People Act, 1950) अंतर्गत, विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.

'SIR' आणि 'SSR' मधील फरक काय आहे?

'विशेष संक्षिप्त पुनरावृत्ती' (SSR) प्रामुख्याने नवीन पात्र मतदारांची नोंदणी करण्यावर आणि मतदार यादीतील किरकोळ दुरुस्त्या करण्यावर लक्ष केंद्रित करते.तर 'SIR' (मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी ) ही अधिक व्यापक प्रक्रिया आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात घरोघरी जाऊन पडताळणी करणे, विद्यमान नोंदींची सूक्ष्म तपासणी करणे आणि डेटाचे मोठ्या प्रमाणावर ऑडिट करणे यांचा समावेश होतो. 'SSR' अंतर्गत एखाद्या मतदाराने आपले निवासस्थान बदलले असेल, तर त्याला पत्ता अपडेट करण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो. याउलट, 'SIR' प्रक्रियेत 'बूथ लेव्हल ऑफिसर' (BLO) संबंधित मतदाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर जाऊन तो तिथे अजूनही राहतो का, याची खात्री करतात. त्याच वेळी, नवीन पात्र मतदारांची ओळख पटवण्याचे कामही केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT