sharad pawar party
शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे Pudhari File Photo
राष्ट्रीय

Sharad Pawar: शरद पवारांच्या 'पक्षा'ला निवडणूक आयोगाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाला सोमवारी (दि.८) मान्यता दिली. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत वापरलेले ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्हही आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे चिन्ह 'तुतारी वाजवणारा माणूस' हेच असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता कलम २९ ब अंतर्गत देणग्याही स्वीकारता येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या 'पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. कारण ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि 'पिपाणी' या चिन्हांमध्ये बरेच साम्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा, दिंडोरी अशा काही लोकसभा क्षेत्रांमध्ये यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचेही शरद पवार गटाचे म्हणणे होते. सोबतच कलम २९ ब अंतर्गत देणग्या स्वीकारण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर आज (दि.८) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली.

दरम्यान, यापूर्वी शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे पक्ष नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. आता त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पक्षांसारख्या सर्वच बाबी आता शरद पवार गटाला लागू होतील.

आज निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कलम २९ ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम २९ बी कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाला कोणत्याही खाजगी व्यक्ती किंवा कंपनीकडून देणगी स्वीकारण्याची परवानगी देते. त्यामुळे यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठीही मान्यता देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष काढून घेण्यात आला, मात्र जनतेने आम्हाला मताद्वारे आशीर्वाद दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करते. आम्हाला तुतारी वाजवणारा माणुस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. मात्र आम्हाला चेक किंवा देणगी घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हते. त्यावर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

दुसरी एक मागणी चिन्हांबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरे तुतारीसारखे पिपाणी हे चिन्ह देण्यात येऊ नये तसेच असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये अशीही विनंती केली होती. त्यावर आयोगाने आमचे म्हणणे एकुन घेवून त्यावर आम्ही अभ्यास करू,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT