राष्ट्रीय

El Nino impact on India monsoon: भारतासाठी चिंतेची बातमी! एल निनोचा यंदा मान्सूनवर परिणाम होणार? जागतिक हवामान संघटनेचा अंदाज

WMO Weather Update: जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) ताज्या अहवालानुसार, वर्षाच्या उत्तरार्धात एल निनो सक्रिय होऊ शकतो, ज्याचा नकारात्मक परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे.

मोहन कारंडे

El Nino impact on India monsoon

नवी दिल्ली: यावर्षी भारतातील मान्सूनवर 'एल निनो'चे संकट ओढवण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) ताज्या अहवालानुसार, वर्षाच्या उत्तरार्धात एल निनो सक्रिय होऊ शकतो, ज्याचा नकारात्मक परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते सध्या याबाबत निश्चितपणे काहीही सांगणे अकाली ठरेल, परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे असले तरी तत्काळ घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

केवळ मान्सूनच नव्हे, तर मार्च ते मे या काळात जगभरातील तापमानात सरासरीपेक्षा मोठी वाढ होण्याचे संकेतही जागतिक हवामान संघटनेने दिले आहेत. भारतात याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले असून, देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटेने नागरिक होरपळून निघत आहेत.

पुढील तीन दिवस महत्त्वाचे: उत्तर भारतात पारा चढणार

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंश सेल्सिअसने जास्त राहू शकते. तसेच दिल्ली-एनसीआरसह उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशात ४ ते ६ अंश सेल्सिअसने जास्त तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय, पुढील पाच दिवसांत दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातही दिवसाचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तज्ज्ञांचे मत: 'घाबरू नका, पण लक्ष ठेवा'

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या एल निनोबद्दल भाकीत करणे थोडे घाईचे ठरेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले की, "मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनो मध्यम स्वरूपात सक्रिय होऊ शकतो. मात्र, सध्याच्या अंदाजांमध्ये बरीच अनिश्चितता आहे. जून महिन्यापर्यंत याची स्पष्ट कल्पना येईल. त्यामुळे सध्या घाबरून न जाता परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे."

कोकणात उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्राने कोकणातील जिल्ह्यांसाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, उत्तर कोकणात कडाक्याच्या उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. १० आणि ११ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT