नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: ईद-उल-फित्रनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. (Eid 2025)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्स या सोशल मीडियावरून ईद-उल-फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, ईद-उल-फित्रच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा सण बंधुत्वाची भावना बळकट करतो आणि करुणा, दानधर्माची भावना स्वीकारण्याचा संदेश देतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो आणि प्रत्येकाच्या हृदयात चांगुलपणाच्या मार्गावर पुढे जाण्याची भावना बळकट करो, अशा सदिच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण आपल्या समाजात आशा, सौहार्द आणि करुणेची भावना वृद्धींगत करणारा आणि सर्व प्रयत्नांमध्ये आनंद, यश देणारा ठरावा, अशा शुभेच्छा दिल्या. तर हा आनंदाचा सण सर्वांच्या आयुष्यात शांती, आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा राहुल गांधींनी दिल्या आहेत.