

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस जोरदार वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान रविवारी शहरात पारा 38 अंशांवर गेला. यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत होत्या.
गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. उन्हाचा तडाखाही वाढत चालल्याने उष्म्याने नागरिक हैराण होऊ लागले आहेत. यावर्षी मार्च महिन्यातच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. यामुळे येत्या दोन महिन्यांत पारा 40 अंशांपुढे जाईल, अशीही शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसत आहे. रविवारीही हवेत सकाळपासून उष्मा जाणवत होता. दुपारनंतर तर उष्मा असह्य बनला होता. दुपारी रखखरणार्या उन्हामुळे अनेक रस्त्यांवरील वर्दळ तुलनेने कमी होती. आज दिवसभरात सरासरी तापमानपेक्षा 1.7 अंशांनी तापमान वाढले. आज 38.1 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. किमान तापमानही सरासरीच्या 2.3 अंशांनी जास्तच राहीले, दिवसभरात ते 23.3 अंश इतके नोंदवले गेले. जिल्ह्यात उकाडा वाढत आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या काही भागात विजेच्या कडकडाट आणि जोरदार वार्यासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.