ED summons Google Meta Betting app scam
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुगल (Google) आणि मेटा (Meta) या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना समन्स पाठवत 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कंपन्यांवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ED विविध ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या जाळ्याचा तपास करत आहे. या अॅप्सना कौशल्याधारित गेम्स असल्याचा बनाव करून प्रत्यक्षात जुगारासाठी वापरले जात होते.
या प्लॅटफॉर्म्सवरून हजारो कोटींचा काळा पैसा निर्माण झाल्याचा संशय असून, तो हवाला मार्गाने परदेशात पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ED च्या म्हणण्यानुसार, गुगल आणि मेटा यांनी या बेटिंग अॅप्सना जाहिरातीसाठी प्राधान्य स्थान उपलब्ध करून दिलं. यामुळे या अॅप्सचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांना आकर्षित केलं.
या जाहिराती फेसबुक, यूट्यूब आणि सर्च इंजिनवरून दाखवल्या गेल्याचं ED ने निदर्शनास आणलं आहे.
तपासात ‘महादेव बेटिंग अॅप’ हे प्रकरण सर्वाधिक चर्चेत आहे. या घोटाळ्याचं एकूण मूल्य सुमारे 6,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी झाली असून, माजी छत्तीसगड मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना अॅपच्या प्रवर्तकांकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा ED चा आरोप आहे.
दुसरं मोठं प्रकरण म्हणजे ‘फेअरप्ले IPL बेटिंग अॅप’. या अॅपने IPL सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम करत बेटिंगची सुविधा दिली. यामुळे अधिकृत ब्रॉडकास्टर Viacom18 ला मोठं नुकसान झालं. अनेक सेलिब्रिटींनी या अॅपचा प्रचार केला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात ED ने 29 लोकांवर गुन्हा नोंदवला, ज्यात अभिनेता प्रकाश राज, राणा डग्गुबाती, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक सोशल मीडिया प्रभावकांचा समावेश आहे. या सर्वांनी आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात या बेकायदेशीर अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे.