ED Officer Arrested for bribe CBI Trap Bribe of ₹20 Lakh Odisha Mining Scam
भुवनेश्वर : भुवनेश्वरमधील सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) ओडिशा विभागीय कार्यालयातील उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 20 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित अधिकारी भारतीय महसूल सेवेत (IRS) 2013 बॅचचे अधिकारी आहेत.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडी अधिकारी रघुवंशी यांनी भुवनेश्वरमधील एका खाण व्यावसायिकाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणातून नाव वगळण्यासाठी एकूण 50 लाख रूपयांची मागणी केली होती. व्यावसायिक श्री. राऊत यांनी या लाचेबाबत सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, सापळा रचून सीबीआयने 20 लाखांची पहिली रक्कम स्वीकारताना अधिकारी रघुवंशी यांना त्यांच्या कार्यालयात अटक केली. यावेळी सापळ्यात वापरण्यात आलेली रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयच्या एफआयआरनुसार, मार्च महिन्यात श्री. राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिथे रघुवंशी यांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि ‘सवलत मिळवण्यासाठी’ भगती नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगितले.
त्यानंतर भगती सतत श्री. राऊत यांच्याशी संपर्कात राहिला होता. तो दबाव टाकत पैसे देण्यास भाग पाडत होता.
27 मे रोजी भगतीने पुन्हा एकदा राऊत यांची भेट घेतली आणि सांगितले की, रघुवंशी 5 कोटी रूपयांची मागणी करत आहेत. या पैशांसाठी त्यांचे हॉस्पिटल जप्त न करणे, अटक न करणे आणि प्रकरण मिटवून टाकण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, राऊत यांनी इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर रघुवंशी यांनी रक्कम 2 कोटींवर आणली.
शेवटी 20 लाखांची पहिली रक्कम स्वीकारताना सीबीआयने रघुवंशी यांना अटक केली. त्यांची चौकशी करून त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यामुळे ईडीसारख्या महत्त्वाच्या तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीबीआयने या प्रकरणात सखोल तपास सुरू केला असून, संबंधित आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी कोणी अधिकारी किंवा दलाल सामील आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. चिंतन रघुवंशी हे 2013 बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत.