Tirupati Laddu Ghee Scam : देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील 'लाडू प्रसादा'साठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 'सुकृती फूड्स'चा मालक कैलास चंद मंगला याला अटक करण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला पुरवले जाणारे 'शुद्ध गाईचे तूप' हे प्रत्यक्षात पाम तेल आणि घातक रसायनांचे मिश्रण होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती बालाजी मंदिरातील 'लाडू प्रसादा'साठी TTD ला 'अगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप' म्हणून पुरवलेले तूप वापरले जात होते. मात्र हे तूप कथितरीत्या रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल ऑईल, पामोलिन आणि विविध रसायने वापरून तयार केले गेले होते.
एका निवेदनात, केंद्रीय एजन्सीने सांगितले की, त्यांच्या हैदराबाद कार्यालयाने TTD तूप भेसळ प्रकरणाच्या संदर्भात १७ सप्टेंबर रोजी कैलास चंद मंगला याला ताब्यात घेतले. त्यानंतर विशाखापट्टणम येथील 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट' (PMLA) अंतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तब्बल ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप तयार केले.
तिरुपती लाडू प्रसादासाठी वापरले जाणारे कथित भेसळयुक्त तूप हे रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल ऑईल, पामोलिन आणि MG-90, मोनोग्लिसराइड्स, मायव्हासेट सॉफ्ट ४०० व ॲसिटिक ॲसिड एस्टर्स यांसारख्या रसायने वापरून तयार केले गेले होते. हे उत्पादन नंतर TTD ला 'अगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप' म्हणून पुरवले गेले. २०१९ ते २०२४ या काळात TTD ला पुरवलेल्या या कथित बनावट तुपाचे मूल्य २३० कोटी रुपये होते आणि मंगलाने ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप तयार केले होते.
मंगला हा या प्रकरणातील सूत्रधारांपैकी एक होता. त्याने भेसळ करण्यासाठी लागणारे घटक मिळवून दिले आणि स्वतःच्या कारखान्यात भेसळयुक्त तूप तयार करत होता. तसेच 'श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज', 'मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स' आणि 'ए.आर. डेअरी फूड्स' यांसारख्या अनेक बनावट कंपन्यांच्या (डमी कंपन्यांच्या) माध्यमातून भेसळयुक्त तुपाचा पुरवठा करण्याचे कामही केले.
"भेसळयुक्त पदार्थांचा प्रत्यक्ष वापर लपवण्यासाठी आणि अस्सल गाईचे तूप तयार करून पुरवल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मंगलाने तूप व रिफाइंड पाम तेलाच्या खरेदी-विक्रीबाबत बनावट नोंदी तयार केल्या आणि त्या तशाच कायम ठेवल्या होत्या," असाही दावा ईडीने केला आहे.
यापूर्वी एजन्सीने 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क'चा मालक आणि संचालक विपिन जैन यालाही भेसळयुक्त तूप प्रकरणी अटक केली होती. आता मंगला न्यायालयीन कोठडीत असताना, ईडीने स्पष्ट केले आहे कि, तिरुपती लाडू प्रसादासाठी गाईचे तूप म्हणून वापरल्या जाणाऱ्या पुरवठ्यामध्ये भेसळयुक्त पदार्थांचा वापर केल्याचे टीटीडी (TTD) तूप भेसळ प्रकरणाच्या तपासातून उघड झाले आहे.