राष्ट्रीय

EaseMyTrip | लष्करी जवानांच्या हवाई तिकीट बुकिंगचं चीन कनेक्शन? ऑनलाइन बुकिंग App च्या प्रमुखांचा गंभीर आरोप

स्क्रीनशॉट्स केले शेअर, सोशल मीडियावर खळबळ, प्रकरण काय?

दीपक दि. भांदिगरे

EaseMyTrip या ट्रॅव्हल कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष निशांत पिट्टी यांनी एका प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल कंपनीवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी एका प्रतिस्पर्धी ट्रॅव्हल कंपनीच्या वेबसाइटमध्ये त्रुटी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की या वेबसाइटचे चीनशी कनेक्शन आहे. यामुळे तिकिटे बुक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या भारतीय संरक्षण दलातील जवानांच्या डेटाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

"भारतीय सशस्त्र दलाकडून चीनच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवरून सवलतीच्या दरात तिकिटे बुक केली जातात. त्यासाठी संरक्षण आयडी, मार्ग आणि तारीख नमूद केली जाते. यामुळे आमचे सैनिक कुठे प्रवास करत आहेत? याची माहिती आमच्या शत्रूंना मिळते," असा दावा पिट्टी यांनी केला आहे. त्यांनी या त्रुटी उघड करण्यासाठी काही स्क्रीनशॉट्स शेअर केलेत.

एका स्क्रीनशॉटवर असे दिसून येते की सशस्त्र दलाच्या सदस्यांसाठी तिकीट बुकिंगवर सूट देण्याचा पर्याय साइटवर उपलब्ध आहे. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, संबंधित कर्मचाऱ्याला त्यांचा "डिफेन्स आयडी" (Defence ID) शेअर करणे आवश्यक आहे.

एक दिवसापूर्वी निशांत पिट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची कंपनी तुर्की आणि अझरबैजान विरुद्ध ट्रॅव्हल ॲडव्हाजरी जारी करणारी पहिली कंपनी होती. "तुर्की आणि अझरबैजान हे देश चुकीच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत हे आमच्या लक्षात येताच आम्ही त्यांच्याविरुद्ध पहिल्यांदा ट्रॅव्हल ॲडव्हाजरी जारी केली. आमच्यानंतर, अनेक ट्रॅव्हल एजन्सींनीदेखील अशाच ॲडव्हाजरी जारी केल्या," असे त्यांनी एएनआयशी बोलतांना सांगितले. चीनशी कनेक्शन असलेले एक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म हे सुरक्षिततेच्या दृष्टीकोतून धोक्याचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'या' पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ

या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून अनेक यूजर्संनी सरकारकडून यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. भारतासोबतच्या संघर्षादरम्यान तुर्की आणि अझरबैजान देशांनी उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले. त्यानंतर दोन्ही देशांत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करुन ते उद्ध्वस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारतातील महत्त्वाच्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण तो भारताने हाणून पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT