E85 Fuel Cars Bikes India:
नवी दिल्ली: सामान्य पेट्रोलपेक्षा तब्बल २० रुपये स्वस्त आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन सुमारे ६१ टक्क्यांनी कमी करणारे इंधन आता भारतात उपलब्ध झाले आहे. ई ८५ इंधनाच्या रूपाने भारताने पर्यायी इंधनक्रांतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. याचा लाभ घेण्यासाठी 'फ्लेक्स फ्यूएल' वाहनांची गरज असेल. देशातील अनेक पंपांवर या इंधनाची विक्री सुरू झाली आहे. मात्र, सध्या ई ८५ इंधन वापरण्यास सक्षम अशा वाहनांचे पर्याय अत्यंत मर्यादित असून भारतीय ग्राहकांसाठी केवळ तीन फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्स उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकीने अलीकडेच वॅगनआर फ्लेक्स फ्युएल सादर केली असून ती भारतातील पहिली फ्लेक्स-फ्युएल प्रवासी कार ठरली आहे. ही कार ई ८५ ते ई १०० पर्यंतच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालू शकते. सध्याच्या भारतीय नियमांनुसार तिचे ई ८५ इंधनासाठी होमोलोगेशन करण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या कारमध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट कॅलिब्रेशन देण्यात आले आहे, जे इंधनातील इथेनॉलचे प्रमाण ओळखून इंजिनचे कार्य आपोआप समायोजित करते. मारुती सुझुकीच्या मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा हा भाग असून कंपनी इलेक्ट्रिक, हायब्रिड, सीएनजी आणि इथेनॉल-आधारित वाहनांवरही भर देत आहे. मात्र, वॅगनआर फ्लेक्स फ्युएलची संपूर्ण वैशिष्ट्ये आणि किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हिरोने स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएल लाँच केली आहे. ही ई २० ते ई ८५ पर्यंतच्या इथेनॉल मिश्रणावर चालण्यास सक्षम असलेल्या भारतातील पहिल्या मोटारसायकलींपैकी एक आहे. ९७.२ सीसी इंजिन असलेली ही मोटारसायकल ई ८५ इंधनावर चालताना ८ हजार आरपीएम वर ६.३ किलोवॅट पॉवर आणि ६ हजार आरपीएम वर ८.३ न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते.
या मोटारसायकलमध्ये हिरोचे आय ३ एस (आयडल-स्टॉप-स्टार्ट) तंत्रज्ञान, डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फंक्शन आणि ट्यूबलेस टायर्स यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएलची किंमत ८२,७१० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.
स्प्लेंडरप्रमाणेच एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएल देखील ई २० ते ई ८५ इंधनावर चालू शकते. यातही ९७.२ सीसी इंजिन असून ६.३ किलोवॅट पॉवर आणि ८.३ 8.3 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण होतो. या बाईकमध्ये सुधारित ईसीयु, अपग्रेडेड फ्युएल सिस्टीम, डिजिटल-अॅनालॉग डिस्प्ले, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि ट्यूबलेस टायर यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएलची किंमत ७२ हजार ७९२ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
हिरोच्या माहितीनुसार, कंपनीच्या फ्लेक्स-फ्युएल मोटरसायकली जुलै २०२६ पासून दिल्ली आणि महाराष्ट्रातील निवडक भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरात त्यांची उपलब्धता वाढवली जाईल. दुसरीकडे, मारुती सुझुकीने वॅगनआर फ्लेक्स फ्युएल शोरूममध्ये नेमकी कधी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल.
इंधन खर्चात बचतीची शक्यता वाढेल.
कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाला फायदा होईल.
देशातील ऊस आणि इतर जैवइंधन पिकांना प्रोत्साहन मिळेल.
दरम्यान, भारतात याआधी 'फ्लेक्स-फ्यूल' क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या कंपन्यांमध्ये टोयोटा कंपनीने ऑक्टोबर २०२२ मध्ये 'कोरोला हायब्रिड'ची फ्लेक्स-फ्यूल आवृत्ती सादर केली होती. त्यानंतर, ऑगस्ट २०२३ मध्ये टोयोटाने 'इनोव्हा हायक्रॉस'चे फ्लेक्स-फ्यूल प्रोटोटाइप सादर केले होते. टाटा मोटर्सने देखील 'पंच' एसयूव्हीच्या प्री-फेसलिफ्ट आवृत्तीवर आधारित आपले पहिले 'फ्लेक्स-फ्यूल' मॉडेल सादर केले. ह्युंदाईने 'ऑटो एक्सपो २०२५' मध्ये क्रेटाची 'फ्लेक्स-फ्यूल' आवृत्ती सादर केली आहे.