E25 Petrol in India: देशभरात E20 पेट्रोल उपलब्ध झाल्यानंतर आता केंद्र सरकारचे लक्ष E25, E30 आणि E85 सारख्या अधिक इथेनॉल मिश्रित इंधनाकडे आहे. मात्र, देशातील कोट्यवधी जुन्या वाहनांची तांत्रिक क्षमता लक्षात घेता सरकार हा बदल टप्प्याटप्प्याने करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे E25 इंधन तातडीने लागू होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारने नियोजित वेळेआधीच देशभरात E20 पेट्रोल उपलब्ध करून दिले आहे. मात्र, जैवइंधन धोरण इथेच थांबणार नाही. भविष्यात E25, E27, E30 आणि E85 या अधिक इथेनॉल मिश्रित इंधनासाठी चाचण्या, इंजिन टेस्टिंग आणि तांत्रिक मानके तयार करण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ, येत्या काही वर्षांत पेट्रोल पंपांवर E20 सोबत इतर इथेनॉल मिश्रित इंधनही उपलब्ध होऊ शकते.
एप्रिल 2023 पूर्वी तयार झालेली बहुतांश वाहने E10 पेट्रोलसाठी डिझाइन करण्यात आली होती. एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीत तयार झालेली वाहने E20 वापरू शकतात. मात्र, एप्रिल 2025 नंतर तयार झालेली नवीन वाहनेच पूर्णपणे E20-कॉम्प्लायंट मानली जातात.
अशा परिस्थितीत जुन्या वाहनांमध्ये E25 किंवा त्यापेक्षा अधिक इथेनॉल असलेले इंधन वापरल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकार पुढील निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, योग्य तयारीशिवाय E25 लागू झाल्यास काही आव्हाने निर्माण होऊ शकतात.
मायलेज कमी होण्याची शक्यता: इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो.
वाहनांच्या पार्ट्सवर परिणाम: जुन्या वाहनांमधील रबर होज, सील, ओ-रिंग, फ्यूल पंप आणि काही प्लास्टिकचे भाग लवकर खराब होऊ शकतात.
देखभाल खर्च वाढू शकतो: जुन्या वाहनांमध्ये अधिक सर्व्हिसिंग किंवा काही पार्ट्स बदलण्याची गरज लागू शकते.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचे मत आहे की सर्व वाहनांसाठी एकाच प्रकारचे इंधन लागू करण्याऐवजी ग्राहकांना पर्याय दिला पाहिजे. E20 साठी तयार असलेल्या वाहनांनी E20 वापरावे, तर E25 किंवा E30 साठी तयार असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र इंधन उपलब्ध करून द्यावे. अनेक देशांमध्ये अशीच पद्धत आहे.
भविष्यात फ्लेक्स-फ्यूल व्हेईकल्स (FFV) हा मोठा पर्याय ठरू शकतो. ही वाहने E20, E25, E30 ते E85 पर्यंत कोणतेही इथेनॉल मिश्रित इंधन वापरू शकतात. अनेक वाहन उत्पादक कंपन्या अशा वाहनांवर काम करत असून सरकारही या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे.
E25 किंवा त्यापेक्षा जास्त इथेनॉल मिश्रित इंधनाचा प्रस्ताव रद्द झालेला नसून त्यावर अजूनही चाचण्या सुरू आहेत. E22, E25, E27 आणि E30 संदर्भातील इंजिन टेस्ट आणि तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे.
सरकारच्या मते, इथेनॉल मिश्रित इंधनामुळे कच्च्या तेलावरील आयात कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्रदूषणातही घट होईल. मात्र, नवीन इंधन लागू करताना वाहनांची सुरक्षितता, इंजिनची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चाचा समतोल राखूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी E25 संदर्भातील चाचण्या सुरू असल्याचे स्पष्ट केले असून, सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्पा राबवला जाईल, असे सांगितले आहे.